देशातील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी/सरवडे
बिद्री साखर कारखान्याने आर्थिक नियोजन आणि उत्तम प्रशासन यांच्या जोरावर देशातील सहकारी संस्थासमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्य पातळीवरील पुरस्कारांत या कारखान्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. आता राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून ‘ बिद्री ‘ ने देशातही आपला दबदबा निर्माण केला आहे. बिद्री चा देशपातळीवरील हा सन्मान राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी केले.
को – जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट को – जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार बिद्री ( ता.कागल ) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को – जन इंडियाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाला सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आम. विश्वजीत कदम, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. पवार पुढे म्हणाले, सध्याच्या बदलत्या परिस्थितीत सहकारी क्षेत्रासमोर अनंत अडचणी उभ्या आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांनी वेगळ्या वाटा चोखाळण्याची आवश्यकता आहे. माजी आ. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्रीने असे उपक्रम राबवून ते यशस्वी करुन दाखवले आहेत. त्यांच्या अभ्यासू, पारदर्शी आणि सभासदाभिमुख कारभाराची आज देशपातळीवर दखल घेतल्याने कारखान्याचा लौकिक सर्वदूर पसरला आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बिद्रीसह इतर सर्वच साखर कारखान्यांचे यशस्वी सहवीज प्रकल्प देशाला दिशादर्शक असून साखर कारखान्यांनी यापुढे साखरेचे उत्पादन कमी करून उपपदार्थाची निर्मिती करणे वाढवले पाहिजे. त्याचबरोबर इंधनाच्या वाढत्या दरातून लोकांची सुटका होण्यासाठी भविष्यात बायोफ्युएल पॉलिसी म्हणजेच जैव इंधन धोरणाचा स्वीकार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या माध्यमातून साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, सहवीज प्रकल्प बिद्रीला वरदानच ठरला आहे. या प्रकल्पाला मिळालेल्या देश पातळीवरील प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली असून यापुढे अधिक कार्यक्षमतेने काम करावे लागेल.हा पुरस्कार ऊस उत्पादक सभासद आणि कारखान्यात राबणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना समर्पित केला आहे.
सहकारी साखर कारखानदारीला बिद्रीचा आदर्श घेण्याची गरज
एका बाजूला सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असताना बिद्री साखर कारखाना सर्वच पातळीवर अतिशय चांगला चालला आहे. बिद्रीने देशातील साखर उद्योगासमोर आदर्श ठेवला असून अन्य कारखान्यांना बिद्रीच्या पाऊलवाटेवरुन चालावे लागेल. बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाची देशातील कारखानदारीला आवश्यकता असल्याचे सांगत खा. शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्वगुणाचे तोंडभरुन कौतुक केले. याशिवाय देशभरातून आलेल्या साखर कारखान्याच्या पदाधिकारी व तंत्रज्ञांनी के.पी. पाटील, संचालक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.









