अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निर्णयावर ट्रम्प यांची टीका
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी स्वत:चा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी स्वत:चा पुत्र हंटरला दोषमुक्त केले आहे, यामुळे हंटरला आता संभाव्य तुरुंगवासापासून दिलासा मिळाला आहे. बिडेन यांनी स्वत:च्या शक्तींचा दुरुपयोग केला असल्याची टीका याप्रकरणी आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
बिडेन यांनी स्वत:चे पुत्र हंटर यांना माफी दिली आहे. न्यायाचा हा एकप्रकारे दुरुपयोग असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी यावेळी जे6 कैद्यांचा उल्लेख केला आहे. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटॉल हिलवर झालेलया दंगलींप्रकरणी अटकेत असलेल्यांना जे6 कैदी म्हटले गेले आहे. ट्रम्प आणि त्यांनी समर्थकांनी या कैद्यांना ओलीस ठरविले आहे. हे लोक शांततेत आणि देशभक्तीने काम करत होते असा दावा ट्रम्प समर्थकांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष झाल्यावर जे6 कैद्यांना माफी प्रदान करतील असे मानले जात आहे.
बिडेन यांनी रविवारी स्वत:चा पुत्र हंटरच्या माफीच्या संबंधित आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हंटरला बंदूक गुन्ह आणि कर उल्लंघनाशी संबंधित आरोपांप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी माफी प्रदान केल्याने हंटरला आता या गुन्ह्यांसाठी शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही तसेच तुरुंगवासाची शक्यताही संपुष्टात आली आहे.
हंटरला केवळ तो माझा पुत्र असल्याने लक्ष्य करण्यात आले आहे. मी माझ्या पूर्ण कारकीर्दीत एका सरळ सिद्धांताचे पालन केले आहे. मी नेहमीच निष्पक्ष राहिलो आहे. न्यायप्रणालीवर माझा विश्वास आहे. एक पिता आणि अध्यक्षाने हा निर्णय का घेतला हे अमेरिकेचे लोक समजून घेतील असे मला वाटत असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.









