वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या बळींचे द्विशतक पूर्ण केले आहे. गुरुवारी येथे झालेल्या लंकेविरुद्धच्या दुसऱया वनडे सामन्यात 28 वषीय कुलदीप यादवने हा विक्रम नोंदविला.
या दुसऱया सामन्यात कुलदीपने आपल्या 10 षटकात 51 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले. या सामन्यात त्याने कुशल मेंडीस, चरिथ असालेंका आणि कर्णधार शनाका यांचे बळी मिळविले. कुलदीपने 107 सामन्यात 23.80 धावांच्या सरासरीने 200 बळी घेतले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याची 113 धावात 8 बळी ही सर्वोच्च कामगिरी आहे. कुलदीप यादवने आठ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व करताना 21.55 धावांच्या सरासरीने 34 गडी बाद केले आहेत. कुलदीपने 74 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना 28 धावांच्या सरासरीने 122 गडी बाद केले आहेत. त्याचप्रमाणे त्याने 25 टी-20 सामन्यात 14.02 धावांच्या सरासरीने 44 गडी बाद केले आहेत. टी-20 प्रकारात 24 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.









