कोल्हापुरातल्या पहिल्या व्यायाम शाळेचे जनक बिभिषण पाटील. रविवारी अमृतमहोत्सव
सुधाकर काशीद,कोल्हापूर
कोल्हापुरात शास्त्रोक्त व्यायामाची पायवाट घालून देणारे बिभीषण पाटील यांचा रविवारी अमृतमहोत्सव समारंभ आहे. त्या निमिताने घेतलेला त्यांच्या वाटचालीचा आढावा…
Bibhishan Patil Kolhapur : जोर बैठका हा व्यायामाचाच प्रकार. पण कोल्हापूरकर त्याला मेहनत म्हणायचे. पोरगं तालमीत मेहनतीला गेलय. शंभर जोर मारतोय. दोनशे उठ्या बशा काढतोय. घामच घाम गाळतोय. असे त्याचे पालक अभिमानाने सांगायचे. पण या मेहनतीचे रूपांतर व्यायाम शब्दात झाले. आणि या व्यायाम शब्दाबरोबरच बिभिषण पाटील हे नाव कोल्हापुरातील तरुण वर्गात सर्वांच्या तोंडी झाले. आज एखाद्या चित्रपट कलाकारासारखी आपली बॉडी झाली पाहिजे अशी तरुण वर्गाची इच्छा असते. पण आपली बॉडी बिभिषण पाटलासारखी झाली पाहिजे ही भावना त्या काळात कोल्हापुरात रुजवण्याचे काम बिभिषण पाटील या तरुणाने केले.
बिभीषण पाटील मूळ आजरा तालुक्यातील सोहाळे गावचे. वडील भीमसेन पाटील हे मिरजेच्या देवाल यांच्या सर्कशीत अचाट शक्तीचे प्रयोग करून दाखवायचे. टोकदार खिळे असलेल्या एका लाकडी फळीवर ते झोपायचे व त्यांच्या शरीरावर ठेवलेल्या एका फळीवरून हत्ती आपले पाऊल टाकत पुढे जायचा. असा अचाट ताकदीचा प्रकार ते करून दाखवायचे. भीमसेन शँडो म्हणून ते प्रसिद्ध होते.
त्यांच्याच प्रेरणेने बिभिषण पाटील व्यायाम करू लागले. सहा फूट उंच, गोरेपान शरीर यामुळे शरीर धष्टपुष्ट नव्हे तर सुडौल कशी असावी याचे मॉडेल बिभीषण पाटील ठरले. त्यांच्या या वेगळेपणामुळे गोखले कॉलेजचे प्राचार्य एम.आर. देसाई यांनी त्यांना कोल्हापुरात आणले. कॉलेजच्या हॉस्टेलवर ठेवले. व कॉलेज करत करत तरुण मुलांना व्यायाम शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले. जैन बोर्डींगच्या तात्या पाटणे यांनी तर बिभिषण यांना दसरा चौकात जैन बोर्डींगच्या जागेत व्यायाम शाळेसाठी एक छोटी खोली दिली. बिभीषण पाटील यांनी महिना दोन रुपये फीवर कोल्हापुरातील पहिली व्यायाम शाळा जैन बोर्डिंग मध्ये सुरू केली.
केवळ जोर, बैठका म्हणजे व्यायाम ही कल्पना त्यांनी बदलवून टाकली. वजन उचलणे छाती, पाठ, पोट, मांडी, दंड यासाठी वेगवेगळे व्यायाम असतात हे त्यांनी शिकवण्यास सुरुवात केली. व कोल्हापुरात व्यायामपटूंची एक नवी पिढी घडण्यास सुरुवात झाली. हे करत असताना बिभिषण स्वतः व्यायाम करत होतेच. त्यांनी कोल्हापूर श्री किताब तर मिळवलाच. पण महाराष्ट्र श्री किताबही मिळवला. व भारत श्री च्या दिशेने आपली घौडदौड सुरू ठेवली. 1980 साली ते भारत श्री झाले..
फक्त केस वाढवून, भारी कपडे घालून, दागिने अंगावर घालून आपण सुंदर दिसत नाही तर, शरीर सुडौल व पिळदार असेल तर प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे खेचले जाते हे बिभिषन पाटील यांनी कोल्हापूरच्या तरुणांना माहिती करून दिले. व कोल्हापूरकरांना व्यायामाचे वेडच लावले. महापालिकेने स्वतःच्या व्यायामशाळा सुरु केल्या. अनेक शरीरसौष्ठवपटू कोल्हापुरात तयार झाले. 18 जण शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत जाऊन पोहोचले.
आता तर कोल्हापुरात अनेक आधुनिक व्यायाम शाळा आहेत. त्याला संगीताची जोड आहे. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वर्ग आहेत. आधुनिक व्यायाम साधने आहेत. जरूर व्यायामाकडे वळलेला एक मोठा वर्ग आहे. आपली बॉडी अमुक एका नटासारखी दिसली पाहिजे अशा जिद्दीतूनही अनेक जण व्यायाम करत आहेत. काहीजण तज्ञांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेत आहेत. जरूर ते सहा महिन्यात दंड व काखा फुगवून फिरत आहेत. पण सप्लीमेंटचे काय तोटे असतात हे देखील त्या अनुभवत आहेत. त्यामुळे चांगले मार्गदर्शन व सल्ला देणाऱया व्यायाम शाळा ही कोल्हापुरात टिकून आहेत. पण बिभिशन पाटील आणि त्या जोडीला व्यायाम हा मात्र कोल्हापुरात कायमचा अधोरेखित झाला आहे.
व्यायाम केल्यावर शरीर झटपट सुडौल व्हावे म्हणून अलिकडे सप्लीमेंट. इंजेक्शन घेणे प्रमाण वाढले आहे. ते घातक आहे. व्यायामानंतर कसदार अन्न घ्यावे. सप्लिमेंट सल्ल्याशिवाय घेतली तर खूप घातक आहे.
बिभिषण पाटील