प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती श्री यल्लम्मादेवी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विदेशी पर्यटकांची वर्दळही वाढली असून नुकतीच दानपेटीतील दागिने व रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यावेळी मंदिराच्या दानपेटीत विदेशी भुतान आणि नेपाळच्या चलनी नोटा आढळून आल्या आहेत.
कर्नाटकासह गोवा आणि महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने येतात. देवस्थानवर सरकारने अलीकडेच प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या देखरेखीखाली देवस्थानचे कामकाज सुरू आहे. भाविकांकडून देवीच्या दानपेटीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अर्पण केली जाते. देशभरातून व परदेशातूनही पर्यटक येत आहेत. त्यामुळे यल्लम्मादेवीचा महिमा वाढत असून मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. नुकतीच दानपेटीतील दागिने व रोख रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यावेळी 5.85 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 1.35 लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने व 71.34 लाख रोकड आढळली आहे. दानपेटीत विदेशी भुतान आणि नेपाळच्या चलनी नोटा दानपेटीत सापडल्या. प्राधिकरण स्थापनेनंतर दानपेटी उघडण्याची ही पहिलीच घटना आहे. प्राधिकरणाचे सचिव अशोक दुडगुंटी यांनी ही माहिती दिली. शासकीय अनुदानाबरोबरच दान दिलेल्या पैशांचा वापर मंदिराच्या विकासासाठी केला जाईल, असे त्यांनी सांगितले.









