भूषण साटम यांचे प्रतिपादन ; मालवणात वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव
मालवण (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य लढ्यादरम्यान बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे गीत भारतीयांचे प्रेरणागीत बनले. वंदे मातरम म्हणत अनेकांनी देशासाठी बलिदान दिले. आज दीडशे वर्षानंतरही वंदे मातरम आपल्यासाठी महत्वाचे असून ते कायम अबाधित राहील. वंदे मातरम म्हणणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आणि राष्ट्रीय ऐक्य आहे, वंदे मातरम हे भारताचे धडधडणारे हृदय आहे, असे प्रतिपादन शिवराज मंच मालवणचे अध्यक्ष श्री. भूषण साटम यांनी येथे बोलताना केले.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत करणारे ‘वंदे मातरम’ या गीताला यावर्षी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या विद्यमाने वंदे मातरम सार्धशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. या अंतर्गत तहसिलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण (आयटीआय) यांच्या आयोजनाखाली मालवणात वंदे मातरम सामूहिक गायन कार्यक्रम मामा वरेरकर नाट्यगृह येथे आज संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा तहसीलदार वर्षा झाल्टे व प्रमुख वक्ते भूषण साटम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, कार्यक्रम समितीचे सदस्य आयटीआय मालवणचे प्राचार्य अमित खेडेकर, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पवन बांदेकर, शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. दिलीप घायतिडक, कौशल्य विकास प्रतिनिधी सिद्धेश घाडीगावकर, प्रा. मंगेश चव्हाण, साहित्यिका सौ. मेघना जोशी, मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे जगदीश गवस, पत्रकार भूषण मेतर, उद्योजक हेमंत शिरगांवकर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते, कबड्डी प्रशिक्षक हरिश्चंद्र साळुंखे, महिला बचत गट प्रमुख मंदाकिनी लोके आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवर व समिती सदस्यांचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य अमित खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्त घेण्यात गीतगायन, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी लघुनाटिका सादर करण्यात आली.यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे म्हणाल्या, स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम गीताने देशवासियांना स्फूरण चढले, वंदे मातरम हे दोन शब्द म्हटले तरी इंग्रज लोकांना मारत होते एवढी धास्ती इंग्रजांनी या गीताची घेतली होती. वंदे मातरम ही मोठी प्रेरणा असून हे गीत हजारो वर्षे अबाधित राहील, या राष्ट्रगीताचा सर्वांनी मान ठेवला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी भूषण साटम यांनी आपल्या भाषणात साहित्यिक बंकिंमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जीवनप्रवास आणि वंदे मातरम गीताचा जन्म याविषयी माहिती दिली. वंदे मातरम हे गीत म्हणजे भारतमाते बद्दलचे प्रेम, लोकांच्या वेदना, संस्कृती, राष्ट्रभक्ती यांचा मिलाफ साधणारे गीत आहे. हे गीत जगणे ही राष्ट्रभावना आहे. आजच्या काळात धार्मिकतेचे रुप देऊन या गीताला विरोध होत असला तरी हे गीत राष्ट्रभक्तीचा मंत्र बनून अबाधित राहणार असेही साटम यांनी सांगितले. यावेळी श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकपणे संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करण्यात आले. तसेच वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले तर आभार प्रा. मंगेश चव्हाण यांनी मानले. यावेळी भाऊ सामंत, विजय केनवडेकर, श्रीधर काळे, पूजा सरकारे, राजेश फोंडेकर, कविता लहारे, गौरव तांडेल, ज्ञानदेव मायबा, संदीप सावंत, सुभाष कांबळी, भरत देऊलकर, संतोष गोवेकर, निक्सन फर्नांडिस, दिलीप गांवकर, श्री. जाधव, श्री. जमादार, दशरथ सावंत, श्री. टिकेकर, दिलीप मच्छिन्द्र यांच्यासह आयटीआय, टोपीवाला ज्युनियर कॉलेज, भंडारी ज्युनियर कॉलेज, रोझरी इंग्लिश स्कुल, सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी चे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.









