महादेव अॅप घोटाळ्यात सीबीआयने बनवले आरोपी
वृत्तसंस्था/ रायपूर
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांना आरोपी बनवले आहे. बघेल यांचा समावेशही लाभार्थ्यांमध्ये असल्यामुळे एफआयआरमधील 19 नामांकित आरोपींपैकी बघेल यांना सहावा आरोपी म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे. यापूर्वी, 5,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या घोटाळ्यात छत्तीसगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बघेल यांचे नाव समाविष्ट केले होते. तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आधारे एफआयआर नोंदवला होता.
राज्य सरकारने एखाद्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला तर प्रक्रियेनुसार केंद्रीय एजन्सी राज्य पोलिसांच्या एफआयआरची स्वत:ची केस म्हणून पुन्हा नोंदणी करते. एफआयआरला तपासाचा प्रारंभबिंदू मानून केंद्रीय एजन्सी प्रकरणाचा तपास करते. त्यानंतर त्याचे निष्कर्ष अंतिम अहवालाच्या स्वरूपात विशेष न्यायालयाला सादर करते. यावर्षी 26 मार्च रोजी सीबीआयने बघेल यांच्या निवासस्थानासह 60 ठिकाणी छापे टाकत झडती घेतली होती.









