वृत्तसंस्था / रायपूर
छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना प्रवर्तन निदेशालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यात घडलेल्या कथित मद्य घोटाळ्याच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली. हा 2 हजार 100 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. मात्र, बघेल यांनी आरोप नाकरला असून आपल्या पुत्राला ईडीने अटक करुन वाढदिवसाची भेटच दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चैतन्य बघेल यांच्या विरोधात पुष्कळ पुरावा असल्याचे प्रतिपादन ईडीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
शुक्रवारी चैतन्य बघेल यांच्या अनेक स्थानांवर धाडी घालण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी ईडीला सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांना तत्काळ अटक करण्याचा निर्णय ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतला. धाडीत अनेक संशयास्पद कागदपत्रे आणि इतर पुरावे सापडल्याचे प्रतिपादन ईडी अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रकरण काय आहे…
2019 ते 2022 या काळात छत्तीसगड मध्ये मद्य घोटाळा झालेला होता, असा ईडीचा आरोप आहे. या घोटाळ्यातून मिळालेल्या अवैध आणि बेकायदेशीर लाभाचा वाटा चैतन्य बघेल यांना मिळालेला आहे. हा घोटाळा मद्य व्यापारी आणि मद्यनिर्मिती करणारे कारखानदार तसेच त्यावेळचे सत्ताधीश यांनी एकमेकांच्या सहकार्याने केला होता. अनेकांची चौकशी या प्रकरणी आतापर्यंत केली गेली आहे.









