प्रवर्तकांकडून मिळाले 508 कोटी : महादेव गेमिंग अॅप प्रकरणी ईडीचा मोठा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, रायपूर
छत्तीसगडमध्ये नुकत्याच उजेडात आलेल्या एका मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात गुंतलेल्या एका व्यक्तीने आपल्या जबानीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहभागाची पुष्टी केल्याचे समजते. या जबानीचा आधार घेत महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी ऊपये दिले असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी केला. याप्रकरणी आता अधिक तपास करण्यात येणार असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या व्यक्तींकडून 5.39 कोटी ऊपये वसूल केल्यानंतर एजन्सीने असीम दासला अटक केली आहे. मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत ईडी ही तपास यंत्रणा सध्या महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची चौकशी करत आहे. याच तपासादरम्यान असीम दासची चौकशी, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी आणि शुभम सोनी (महादेव नेटवर्कच्या उच्चपदस्थ आरोपींपैकी एक) यांनी पाठवलेल्या ईमेलच्या तपासणीतून अनेक धक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. महादेव अॅपचे प्रवर्तक यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना नियमित पेमेंट करत होते आणि आत्तापर्यंत सुमारे 508 कोटी ऊपये देण्यात आल्याचे उघड झाले आहे. सध्या निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली असतानाच मुख्यमंत्र्यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढे आल्यामुळे त्यांच्यासमोरीच अडचणी वाढल्या आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.









