नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी निवड ः मोदींच्या उपस्थितीत उद्या शपथविधी
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. आता ते सोमवार, 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सोमवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गुजरातमधील विधानसभेच्या 182 पैकी 156 जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयाचा उत्सव शपथविधी सोहळय़ात साजरा होऊ शकतो.
गांधीनगर येथे शनिवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राज्यात नवीन सरकार स्थापनेपूर्वी शुक्रवारी औपचारिकपणे राजीनामा दिला होता.
भूपेंद्र पटेल यांची निवड ही केवळ औपचारिकता
विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड ही केवळ औपचारिकता होती. पक्षाने निवडणुकीपूर्वीच पटेल यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली होती. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी निकालानंतर पटेल पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची पुष्टी केली होती. 12 डिसेंबर रोजी पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
भाजपचा ऐतिहासिक विजय
1962 मध्ये गुजरातमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर, गेल्या 60 वर्षांत एखाद्या पक्षाने गुजरातमध्ये 150 किंवा त्याहून अधिक जागा जिंकल्या नव्हत्या. यंदा प्रथमच भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकून नवा इतिहास रचला आहे. तर काँग्रेसला 17, आम आदमी पार्टीला 5 आणि इतरांना चार जागा मिळाल्या आहेत.









