खेड प्रतिनिधी
भोस्ते जगबुडी पूल गुरूवारपासून खबरदारीच्या दृष्टीने अवजड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने या पुलावरून अवजड वाहतुकीस मनाई केली असून या पुलावरून अवजड वाहने धावल्यास कारवाईला समोर जावे लागणार असल्याचे समजते.
खेड शहरालगतच्या भोस्ते जगबुडी पुलावरून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. मात्र 4 वर्षापूर्वी या पुलाच्या एका बाजूला तडा गेल्याने पुलाची सुरक्षितता ऐरणीवर आली होती. जिल्हा परिषद बांधकाम खात्याने येथे तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत हा पूल वाहतुकीसाठी सुरळीत केला होता. मात्र पूल धोकादायक असल्याने त्याची दुरूस्ती करण्याच्या मागणीने जोर धरला होता. बांधकाम खात्याने पाठवलेला पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर धूळखात पडला असल्याचे समोर आले आहे.
या पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या पुलावरून वाळूची वाहतूकदेखील होत असल्याचे समोर आले आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव केला आहे.