वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील विदिशामध्ये सोमवारी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अचानक आग लागली. सुदैवाने आग न भडकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सकाळी भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमधील बॅटरी बॉक्समध्ये विदिशाजवळ पोहोचल्यानंतर आग लागली. मात्र रेल्वेच्या आपत्कालीन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणताही रेल्वे प्रवासी जखमी झालेला नाही. वंदे भारत एक्स्प्रेस विदिशातील कुरवई स्थानकावरून सोमवारी सकाळी निघत असतानाच ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रेल्वे थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या डब्यात 36 प्रवासी होते. या घटनेनंतर रेल्वे थांबवून अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझविण्यात आली. या घटनेमुळे एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा जवळपास तासभर खोळंबा झाला.









