नादियातील गावात भरतो मेळा
वैशाख मासामध्ये पश्चिम बंगालच्या नादिया येथील फुलिया तालतला येथे विशेष मेळा आयोजित होतो. या गावात आयोजित होणारी ‘भूत पूजा’ पाहण्यासाठी मोठय़ा संख्येत लोक येथे पोहोचत असतात. फाळणीदरम्यान 1950-52 दरम्यान तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून येत अनेक लोक येथे स्थायिक झाले होते. ही ‘भूत पूजा’ बांगलादेशातही केली जाते. पूर्व पाकिस्तानातून आलेल्या लोकांनी नादियामध्ये ‘भूत पूजा’ आयोजित करण्यास सुरुवात केली.

दरवर्षी गावातील लोक स्वतःच्या हातांनी ‘मूर्ती’ तयार करतात. या मूर्तीला शीर अन् मान असते. तर शरीराच्या खालील हिस्स्यात डोळे, नाक अन् तोंड असते. मूर्ती जमिनीवर ठेवून त्याची पूजा केली जाते. या पूजेची सुरुवात पाचव्या शतकात एक संन्यासाने केली होती. तेव्हापासून या पूजेसाठी एका मेळय़ाचे आयोजन होत आले आहे. या भूतपूजेचा अर्थ बांगला नववर्षाच्या प्रारंभी वाईट विचार सोडून देत नव्या ऊर्जेसह नव्या कार्यांना प्रारंभ करणे असल्याचे स्थानिकांचे सांगणे आहे.
नादिया जिल्हय़ातील या गावात ही पूजा 55-60 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. या पूजेकरता लोक मोठय़ा संख्येत गर्दी करत असतात. या पूजेत भाग घेतल्याने मनोकामना पूर्ण होतील अशी लोकांची श्रद्धा आहे.









