कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ संकल्प : भरीव देणग्या जाहीर
वार्ताहर/हिंडलगा
येथील बॉक्साईट रस्त्यालगत (वनखात्याच्या ऑफीसशेजारी) असलेल्या हुतात्मा स्मारक आवारात 1 जून 1986 च्या कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीविरोधात झालेल्या आंदोलनात समितीचे 9 हुतात्मे झाले. त्यांच्या स्मरणार्थ ‘स्मृति भवन’ बांधण्याचा संकल्प मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. त्यानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते.
प्रथम हुतात्मा स्मारकाचे पूजन उचगाव येथील उद्योजक प्रगतशील शेतकरी बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रास्ताविकात मनोहर किणेकर यांनी सीमालढ्याचा इतिहास सांगून माय मराठीच्या रक्षणासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे त्या लढ्याचा इतिहास नवीन पिढीला समजावा व मराठी भाषा, मराठी लिपी व मराठी संस्कृतीचे कायमस्वरुपी रक्षण व्हावे या उद्देशाने स्मृति भवन बांधण्याचा संकल्प केला असल्याचे सांगून स्वागत केले. व्यासपीठावर म. ए. समितीचे नेते प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, शुभम शेळके, अंकुश केसरकर, प्रकाश शिरोळकर, गोपाळ पाटीलसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी हुतात्म्यांचे वारसदार व आंदोलनात जखमी झालेल्या युवकांचा सहभाग होता. तालुका समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी परिचय करून दिला. हिंडलगा व बेळगुंदी येथे हुतात्मा झालेल्यांचे वारसदार बसवंत कदम, अनिल पाटील, शिवाजी चव्हाण, जोतिबा उचगावकर व जखमी झालेल्यांचे वारसदार मोहन पावशे (हिंडलगा), मारुती शिंदे (बेळगुंदी), भरमा मरूचे (कल्लेहोळ), मारुती खन्नुकर (जुने बेळगाव) यांचा समावेश होता. या सर्वांचा शाल, श्रीफळ, गुलापुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव केला.
भूमिपूजन म. ए. समितीचे युवा नेते व प्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनिअर आर. एम. चौगुले, पत्नी प्रिती आर. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. एम. चौगुले यांनी 5 लाख, शंकर एम. चौगुले यांनी 1 लाख 51 हजार, डी. एम. चौगुले यांनी 1 लाख रुपये अशा देणग्या जाहीर केल्या. बी. एस. होनगेकर यांनी बी. एस. ट्रेडर्सतर्फे 1 लाखाची देणगी जाहीर केली. याशिवाय रमाकांत कोंडुसकर 1 लाख, तानाजी पाटील यांच्याकडून 1 लाख अशा देणग्यांबरोबरच इतर नेते मंडळींनीही भरीव देणग्या जाहीर केल्या.
याप्रसंगी मालोजीराव अष्टेकर व इतर नेत्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले. यावेळी आर. एम. चौगुले यांनी नियोजित ‘स्मृति भवन’चा आराखडा सांगून अपेक्षित खर्चाची माहिती दिली. कार्यक्रमाला जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, प्रेमा मोरे, ता.पं. माजी सदस्या कमल मनोळकर व समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, सीमाभागातील मराठीप्रेमी जनता व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









