ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र-राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन
खानापूर : खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू. तसेच तालुक्यातील रस्त्यांचा विकास दोन-तीन वर्षात करून रस्त्यांची समस्या कायमची मार्गी लावू. रस्त्यांमुळे तालुक्याशी आणि जिल्ह्याशी संपर्कात अडचणी येणार नाहीत. यासाठी ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर आणि मी प्रयत्नशील आहोत, असे उद्गार खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी पूर ते अळणावर या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप, प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, सुनील मड्डीमणी, श्रीकांत इटगी, सुंदर कुलकर्णी, श्रीशैल्य माटोळी, राजू रपाटी, मारुती हरिजन, आप्पाराव पाटील, जोतिबा सुतार, शिवानंद गोधळी, राजू करंबळकर व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून तालुक्यामध्ये 50-54 योजनेअंतर्गत पूर, रामगुरवाडी, भंडरगाळी, सन्नहोसूर, गर्लगुंजी, इदलहोंड, अंकले, नागुर्डा संपर्क रस्ता तसेच काटगाळी-गंगवाळी, अॅप्रोच जांबोटी वाडा, अॅप्रोच तोपिनकट्टी-बिदरभावी, तोलगी-चिक्कमुन्नोळी, करंजाळ-शिंपेवाडी गावांच्या रस्त्याच्या विकासासाठी 10 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
कसमळगी-मंग्यानकोप येथे समुदाय भवनचे भूमिपूजन
यावेळी कसमळगी व मंग्यानकोप येथे समुदाय भवनचे भूमिपूजन करण्यात आले. गंदीगवाड येथील जैन समाजाच्या 1009 पंचकल्याण महोत्सवामध्ये उपस्थित राहून जैन समाजाच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. नेरसा येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन कळसा-भांडुराबाबत नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या. यावेळी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गुरवसह राजाराम गुरव, सदानंद होसुरकर, प्रकाश मजगावी यांनी खासदारांची भेट घेऊन मेमध्ये होणाऱ्या कुस्ती आखाड्याचे निमंत्रण दिले. खासदारांनी निमंत्रण स्वीकारुन कुस्ती आखाड्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.









