मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून दीड कोटीचा निधी मंजूर : आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची माहिती
वार्ताहर/कणकुंबी
विकासाच्या बाबतीत खानापूर तालुका पिछाडीवर आहे. तालुक्यात अद्यापही अनेक समस्या आहेत. मी देखील खानापूर तालुक्याचा सुपुत्र असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तालुक्यातील रस्ते, पाणी, ब्रिज, शाळा, मंदिर आदी विकास कामांसाठी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या घरात एक मंत्री व आमदार असून खानापूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मात्र आपले प्रेम आणि सहकार्य असणे गरजेचे आहे, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कर्नाटक राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून त्याचे भूमिपूजन आमदार चन्नराज हट्टीहोळी व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी स्वयंभू मारुती पूजन काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसार्लेकर होते. व्यासपीठावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, आमटे ग्रा.पं. अध्यक्षा सरस्वती भरणकर, चेतन मणेरीकर, सदस्या पार्वती नाईक, अप्पय्या कोडीळी, निर्मिती केंद्राचे प्रोजेक्ट इंजिनियर विजय कल्लोळी, ता. पं. असिस्टंट डायरेक्टर विजय कोतीन, पीडीओ एम. एम. मोकाशी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. देवस्थान कमिटीचे माजी सेक्रेटरी सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक केले. कमिटीच्यावतीने नेताजी घाडी, सखाराम धुरी, नानू गावडे, पुंडलिक पाटील व इतर सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मृणाल हेब्बाळकर, यशवंत बिर्जे, लक्ष्मण कसार्लेकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी आमटे पंचायतीचे सर्व सदस्य, बैलूर, गोल्याळी, जांबोटी ग्र. पं. सदस्य, गावातील पंचकमिटी व नागरिक उपस्थित होते. कबनाळीतील पुरातन शिवमंदिर जीर्णोद्धारसाठी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी 5 लाखांचा निधी दिल्याबद्दल विनायक मुतगेकर यांनी कबनाळी गावच्यावतीने त्यांचे आभार मानल़े









