चौपदरीकरण विरोधात रविवारी जाहीर सभा
वार्ताहर /माशेल
भोम येथील लोकवस्तीतून चौपदरी महामार्ग नेण्यास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून काल रविवारी सकाळी तेथील जागृत देवस्थान असलेल्या श्रीनागझरकर राखणदाराला सामूहिक गाऱ्हाणे घातले. सरकारला याप्रकरणी सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली. आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यासाठी येत्या रविवारी 15 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित हेते. राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार करताना भोम गावातून चौपदरी रस्ता नेण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. त्याला पर्याय म्हणून बगलरस्ता तयार करावा या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून भोमच्या ग्रामस्थांनी विरोध सुरू केला आहे. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून ग्रामस्थांनीही अखेरपर्यंत आपल्या मागणीसाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी अनेक बैठका व सभा घेऊन सरकारपुढे आपली मागणी ठेवली आहे. राज्यातील काही संस्थांनी भोमवासियांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रविवारी ग्रामस्थांनी गावातील जागृत देवस्थान असलेल्या नागझरकर राखणदाराला गाऱ्हाणे घालून सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. येत्या रविवारी होणाऱ्या जाहीर सभेला राज्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विरोधी पक्षांतील आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक संजय नाईक यांनी दिली. ग्रामस्थ आपल्या मागण्यापासून कुठलीच तडजोड करणार नसून अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.









