विद्यार्थ्यात नाराजी, तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /हरमल
येथील भोम हरमल पठारावरील हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेकडे जाणारा रस्ता सध्या चर्चेचा विषय आहे. पालकांनी वाटच बदलली तर शिक्षक वर्गानी सुद्धा पालकांच्या वाटेने जायचे ठरविले. मात्र रस्ता बदलण्याची कारणे बहुश्रुत असली तरीही विध्यार्थ्यांनी नाराजी व संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या तीन वर्षांपासून कोविडच्या स्थितीमुळे सरकारकडे निधीची चणचण होती व कित्येक विकासकामे पूर्णतः रखडली होती. प्रत्येक मतदारसंघात प्राधान्याने कामे घ्यायची सोय नव्हती, त्यामुळे कामे रखडली गेली. ह्या पंचायत क्षेत्रांतील भोम हरमल रस्त्यांची स्थिती पाहता ते काम प्राधान्याने घेण्याची गरज होती. शेकडो विध्यार्थी त्या पठारावरील शाळा, कॉलेजमध्ये शिक्षणाचे धडे घेत असतात, त्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यांची सोय करायला हवी होती, असे मत पालक शुभंकर नाईक यांनी व्यक्त केले.
रस्त्यांच्या दुतर्फा झाडी व झुडुपे बरीच वाढली असून आधीच रस्ता अरुंद, खड्डेमय व त्यात झुडुपांची दाटी वाहनचालकांना डोकेदुखी ठरली आहे. कित्येकांना झाडीचा फटका बसला तर काहींना मनस्ताप सोसावा लागत आहे.
हॉटमिक्सिंग एकमेव पर्याय : नरेंद्र पायनाईक
दरवषी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सरकार घेत असल्याने काहीअंशी वाहनचालक समाधानी आहेत. मात्र खड्डे बुजविण्यापेक्षा रस्त्याला हॉटमिक्सिंग हा पर्याय असल्याचे मत वाहन चालक नरेंद्र पायनाईक यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मांदे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी डिसेंबर महिन्यांत रस्त्यांचे डांबरीकरण होण्याची शक्मयता व्यक्त केली आहे. तरी गणेशचतुर्थीनंतर किमान रस्त्याची हालत सुधारावी व विद्यार्थी, वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.









