121 जणांनी गमाविला होता जीव : आयोजकांवर ठपका
वृत्तसंस्था/ हाथरस
उत्तरप्रदेशच्या हाथरसमध्ये मागील वर्षी 2 जुलै रोजी सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत न्यायालयीन आयोगाने स्वत:चा चौकशी अहवाल राज्य सरकारला सोपविला आहे. अंतिम अहवालानुसार सूरजपाल उर्फ भोले बाबाला याप्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. या दुर्घटनेत 121 जणांचा मृत्यू झाला होता. आयोगाने या दुर्घटनेसाठी आयोजकांनाच जबाबदार ठरविले आहे. तर प्रशासन आणि पोलिसांकडूनही निष्काळजीपणा झाल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.
हाथरस येथील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकारकडून न्यायालयीन आयोग स्थापन करण्यात आला होता. सूरजपाल उर्फ भोले बाबाच्या सत्संग आयोजनानंतर चेंगराचेंगरी होत अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. आयोगाचा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला असून विधिमंडळात सादर करण्याची मंजुरीही देण्यात आली आहे.
आयोगाच्या अहवालानुसार ज्या सत्संगाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली तेथे आयोजकांनी सुरक्षा मापदंडांचे पालन केले नव्हते. तर कथावाचक भोले बाबाला या चौकशीत क्लीनचिट देण्यात आली आहे. भोलेबाबाचा चेंगराचेंगरीच्या घटनेशी कुठलाही संबंध नव्हता. आयोजकांचे गैरव्यवस्थापन आणि संबंधित ठिकाणी अधिक गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली होती. पोलिसांनी स्वत:च्या जबाबदारीचे योग्यप्रकारे पालन केले नाही. गर्दी व्यवस्थापनासाठी कुठलीच ठोस व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलीस आणि प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती असे अहवालात म्हटले गेले आहे.









