चिपळूण :
करंबवणे खाडीलगत असलेल्या मिले-जांभुळवाडी खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून एकूण ८३ लाखांचा निधी दोन वर्षभरापूर्वीच मंजूर झाला होता. मात्र ठेकेदाराने कामे अर्धवट ठेवल्याने ही योजना संकटात सापडली आहे. उघाडीची झडपे बसवली नसल्याने आणि भरावही अर्धवट असल्याने पावसाळ्यात तोही वाहून जाण्याची चिन्हें आहेत. तसे झाले तर शेतकऱ्यांचा मार्गच बंद होणार असल्याने सध्या शेतकरी मीतीच्या छायेत आहेत.
समुद्राच्या भरतीचे खारे पाणी शेतात घुसून होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीकिनारी संरक्षक बंधारे बांधून संबंधित क्षेत्र लागवडीयोग्य करण्याच्यादृष्टीने खारभूमी विकास योजना राबवली जात आहे. भिले येथील या योजनेत गावच्या खाजन जमिनीच्या लगत असलेल्या करंबवणे खाडीला वळसा घालणारा दोन कि. मी लांबीचा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या योजनेमुळे एकूण ८४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या योजनेच्या उघाडीच्या नादुरुस्तीमुळे गेली दोन वर्षे सातत्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या योजनेच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी सातत्याने आमदार निकम यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी ८३ लाखांचा निधी मंजूर केला.
दरम्यान, निधी मंजूर झाल्यानंतरही संबंधित ठेकेदार दिरंगाई करत होता. अखेर वर्षभरानंतर यावर्षीच्या उन्हाळ्यात कामाला सुरुवात झाली. या दुरुस्तीमध्ये बंधाऱ्याला भराव आणि दोन्ही बाजूला दगडी पिचिंग या कामाचा समावेश असून पाणी जाण्या-येण्यासाठी उघाडीचे काम हाती घेतले. त्यानुसार ती बांधूनही झाली. मात्र पावसाळा सुरू झाला तरी त्याची झडपे बसवली गेलेली नाहीत. शिवाय यावरही भरावाचे काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे. मोठा पाऊस अजून न झाल्याने हा भराव अद्याप शाबूत आहे. मात्र काम लवकर पूर्ण न झाल्यास टाकलेला भरावही वाहून जाणार आहे. परिणामी पलिकडे जाण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग बंद होणार आहे. शिवाय पाणी तुंबून शेतीचेही नुकसान होणारे आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
- शेतीबरोबरच जाणे-येणेही धोक्यात
खारभूमी विकास योजनेच्या दुरुस्तीअभावी पावसाळ्यात पाणी तुंबून शेती पाण्याखाली जाते. यावर्षी उघाडीचे काम पूर्ण होऊन त्यातून दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र ठेकेदार अथवा खारभूमीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याने सर्व कामे अर्धवट राहिली आहेत. पावसाळ्यात या मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याने प्रशासनाने तत्पर कार्यवाही करावी.
– रमेश तलगे, शेतकरी, मिले-चिपळूण








