सुधाकर काशीद
मैत्रीचे प्रतीक म्हणून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मैत्री दिन साजरा करण्याची प्रथा आहे. अडचणीच्या वेळी कोण मदतीला धावून आले नाही तर मित्र तरी येतोच हा बहुतेकांचा अनुभव आहे. त्यामुळे जीवनात मैत्रीचे स्थान अमूल्य आहे.वेगवेगळ्या माध्यमातून हा दिन आज साजरा झाला.पण कोल्हापुरात असा एक रस्ता आहे की तो फक्त मैत्री या शब्दाचे प्रतीक आहे.भावसिंगजी रोड असे त्याचे नाव आहे.आणि तो चक्क आपली राजर्षी शाहू महाराज व भावनगरचे महाराज भावसिंगजी या दोघातील मैत्रीचा अतूट असा धागा आहे.अर्थात नवी पिढी हे सारे विसरून गेली आहे.पण जोवर भाऊसिंगजी रोड आहे,तोवर शाहू महाराज आणि भावसिंगजी महाराज यांच्या मैत्रीची स्मृती जिवंत राहणार आहे.
जुना राजवाडा ते नवीन राजवाडा हा रस्ता म्हणजे कोल्हापूरचा राजमार्ग.या रस्त्याला खूप महत्त्व.कारण रस्त्याच्या एका टोकाला जुना व दुस्रया टोकाला नवीन राजवाडा.कोल्हापुरातले त्या काळातले जे जे महत्त्वाचे ते याच रस्त्यावर . या रस्त्यावरून जाताना पहिल्यांदा जुना राजवाडा ,नंतर नगार खाना ,राजाराम हायस्कूल , उजव्या हाताला करवीर नगर वाचन मंदिर ,डाव्या हाताला खर्डेकर बोळ,अंबाबाई मंदिर ,सराफ व्यवसायाची मोठी उलाढाल असलेली गुजरी ,नालबंद वाडा ,शहरातले सर्वात श्रीमंत गृहस्थ नगरशेठ यांची पाच मजली हवेली,शाहू महाराजांनी सुरू केलेला पहिला होमिओपॅथी दवाखाना ,संस्थानकालीन हुजूर गल्ली ,घुडनपीर दर्गा
डॉक्टर जयंत नारळीकर यांचे आजोळ असलेली भेंडी गल्ली ,विल्सन चौक म्हणजे आताचा छत्रपती शिवाजी चौक ,फेरीस मार्केट म्हणजे आत्ताचे शिवाजी मार्केट ,माळकर वाडा , खाना , नगरपालिका इमारत , बोर्ड ऑफिस , ट्रेझरी (सिटीसर्वे ), टाऊन हॉल उद्यान , चौधरी वाडा ,गुणेवाडा ,तेंडुलकर वाडा , समाज सुधारणेचे प्रतिक गंगाराम कांबळे यांचे हॉटेल , टेलीफोन ऑफिस , करवीर चावडी , जिल्हा न्यायालय,थोरला दवाखाना ,पुराभी लेख कागदपत्रांचे दालन, पॉवर हाऊस (करवीर पंचायत ), दरबार सर्जन सिंक्लेअर यांचा बंगला .बारा खोल्याचा हा बंगला आजही आहे पण वीना वापर पडून आहे . जैन बस्ती ,उजव्या हाताला असेंब्ली रोड (कलेक्टर ऑफिस . ) वाडा, इचलकरंजीकर बंगला, महावीर कॉलेज व तेथून नेसरीकर वाड्याच्या पुढे नवीन राजवाडा. दस्रयाचे सोने लुटण्यासाठी जो शामियाना निघतो तो याच रस्त्यावरून. इतक्या साऱ्या महत्त्वाच्या वास्तूमुळे हा रस्ता तसा राजपथच होता.
या राजपथालाच शाहू महाराजांनी त्यांचे मित्र भावसिंगजी यांचे नाव दिले.त्याला कारण म्हणजे,ते दोघे राजकोट येथे एकत्र शिकायला होते. त्या काळात त्यांची मैत्री झाली.पुढे भावसिंगजी यांच्याकडे भावनगरचा राज्यकारभार आला .त्यांनी शाहू महाराजांच्या प्रमाणे आपल्या संस्थानात खूप चांगली कामे केली .या दोघातील संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेले .आपल्या या मैत्रीची स्मृती कायम राहावी म्हणून त्यांनी भावसिंग जी रोड असे या रस्त्याला नाव दिले. पुढे या भाव सिंग रोडला लोक अपभ्रंशाने भाऊसिंगजी रोड असे म्हणू लागले.
आजही भावसिंगजी रोड आहे पण त्याचे मूळ स्वरूप बदलले आहे.सोने-चांदी ,औषध , कपडे, मिठाई या उलाढालीसाठी आता प्रसिद्ध आहे.रस्त्याचा मूळ दिमाख गेला आहे.पण झगमगाट वाढला आहे.हा भावसिंगजी रस्ता रॉयल स्ट्रीट म्हणून शंभर फुटी करण्याचा महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांचा संकल्प होता.पण कपूर यांची बदली झाली.त्यानंतरही या रस्त्याला राजपथाचे स्वरूप देण्याविषयी फक्त चर्चा होत राहिली.या रस्त्याला भावसिंगजी रस्ता का म्हणतात हे देखील नवी पिढी काळाच्या ओघात विसरली.पण जोवर हा रस्ता आहे तोवर भाव सिंगजी रस्ता हे नाव कायम राहणार आहे.आणि शाहू महाराज जसा खेळ जपत ,समाजकारण जपत , शेती जपत , जपत तशी मैत्रीही कशी जपत याचे ते चिरंतन प्रतीक असणार आहे.