आज यात्रेचा मुख्य दिवस : अन्य राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल
वार्ताहर/दड्डी
‘चांगभलं’च्या गजरात भावकाई देवीच्या यात्रा महोत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सुमारे 5 हजार भाविकांनी शस्त्र इंगळीचा लाभ घेतला. गुरुवारी सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी 2 लाख भाविकांनी हजेरी लावली असून संपूर्ण मोदगा गाव भाविकांनी फुलून गेला आहे. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने भाविकांची गर्दी होत आहे. बेळगाव, गोवा, कोकण महाराष्ट्रातून भाविक मिळेल त्या वाहनांनी मोदगा गावात दाखल होत आहेत. गावानजीकच्या शेतवडी भाविकांनी भरून गेल्या आहेत. श्रद्धापूर्ण वातावरणात भावेश्वरी यात्रा होत आहे. मंदिर परिसरात भाविक रांगेत राहून दर्शन घेत आहेत. देवीच्या नावानं चांगभलंचा गजर व भंडाऱ्याची उधळण करीत देवीचे दर्शन घेतले जात आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भंडाऱ्याचा खच पडल्याचे दिसत होते.
यंदा बकऱ्यांच्या दरात कमालीची तेजी पाहावयास मिळत असतानाही किमतीकडे लक्ष न देता त्यांची खरेदी करण्यासाठी भाविकांनी कोणतीच कसर ठेवली नाही. मंदिर परिसरात विविध स्टॉल थाटण्यात आले आहेत. तालुका प्रशासनाने यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शुद्ध पाणी व 24 तास वीजपुरवठा करण्यात आल्यामुळे यात्रेकरूंना सोयीचे झाले आहे. गुरुवारी दिवसभरात कोट्यावधी ऊपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. भाविक व यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी खास वैद्यकीय सेवा सज्ज केली आहे. देवीचे सुलभ दर्शन मिळण्यासाठी भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष भाऊराव पाटील, सचिव संतराम पाटील, चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, भागोजी पाटील, नंदकुमार पाटील, माऊती पाटील व अप्पा पाटील व श्री भावकाई देवी मंदिर परिसर विकास व यात्रा उत्सव कमिटी मोदगे (मुंबई) यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.









