लक्ष्मणभाऊ मडगावकर यांचे प्रतिपादन
कुडचडे : सांगे – केपे तालुक्यावर भाऊसाहेबाचे अपार प्रेम होते हे त्यांनी निर्माण करून उजेडात आणलेल्या निसर्गरम्य सांस्कृतिक व पर्यटन स्थळावरून दिसून येते असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक तथा भाऊसाहेबांचा सहवास लाभलेले लक्ष्मणभाऊ मडगावकर यांनी सांगे येथिल उद्यानात भाऊसाहेबाच्या 112 व्या जयंतीनिमित्त दयानंद कला केंद्र कुडचडे तर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलताना सांगितले. भाऊसाहेबांनी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात सांगे – केपेच्या टोनी फर्नांडिस व श्रीरंग करमली या दोन सुपुत्राना मंत्री बनविले आणि ह्या तालुक्याच्या विकासाचे दरवाजे खुले केले, असेही ते म्हणाले. सांगे तालुक्यात सळावली धरणाचा शिलान्यास बसवून संपुर्ण गोव्याला पाणी पुरवठ्याची सोय केली हे गोमंतकीयांनी केव्हाही विसरू नये अशा समाजपयोगी कार्याची जाण युवा पिढीला द्यायला पाहिजे. ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे असे मोर्तू नाईक यांनी सांगितले. यंदाचे वर्ष 2023 भाऊसाहेबाची 50 वी पुण्यातीथी वर्ष आहे आणि आमची संस्था गेली 50 वर्षे पुण्यतिथी व जयंती साजरी करणारी गोव्यातील एकमेव सांस्कृतिक संस्था आहे आणि सांगे – केपे तालुके आमचे कार्यक्षेत्र असल्याने आम्ही या वर्षी त्यांच्या कार्याची जागृती व आठवण करून देणारे कार्यक्रम गोव्यात आणि गोव्याबाहेरही करण्याचे नियोजित केले असून त्याच संकल्पनेचा हा एक भाग आहे असे केंद्राचे उपाध्यक्ष तथा जलसिंचत खात्याचे सुभाष चं. नाईक यांनी नमुद केले. यावेळी मगो पक्षाचे 2007 निवडणूकीचे सांगेचे उमेदवार आनंद वेळीप हे उपस्थित होते. त्यांनी सांगेत जयंती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले व शासनाकडून अशा समारंभाना योग्य सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडचडेचे नगरसेवक भाई नाईक, शेल्डेचे समाजसेवक मोहनदास गावस देसाई, सावर्डेचे बहुजन समाज कार्यकर्ते भिकू नाईक, पंचवाडी माजी पंच केशव नाईक कुडचडे पतंजली शाखा स्वयंसेवक सदानंद खांडेकर , जन उत्कर्ष शिक्षण संस्था सदस्य राया देसाई, संस्थेचे अध्यक्ष मोर्तू नाईक, कोषाध्यक्ष नविन खांडेकर इत्यादिनी उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली. सचिव गोविंद गावडे यांनी सर्वानी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.









