मंत्री सुदिन ढवळीकरांचे नूतनीकरणाकडे विशेष लक्ष
जगन्नाथ मुळवी /मडकई
मुक्त गोव्याचे शिल्पकार स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीला अर्पण केलेले काशिमठ बांदोडा येथील मैदान अद्ययावत व विविध सुविधांनी सुसज्ज बनविण्याचा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोडलेला संकल्प त्यांचा ध्यास बनलेला आहे. त्यांच्या या संकल्पाची पुर्तता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे.
भाऊसाहेब हे क्रीडापटू व क्रीडाप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना अर्पण केलेले मैदानही अद्वितीय असेच असावे, हा मंत्री ढवळीकर यांचा मनोदय आहे. सध्या या मैदानाची दुरुस्ती करून त्यावर नवीन साज चढविण्याचे काम सुरू असून मंत्री ढवळीकर आठवडय़ातून दोन वेळा कामाच्या ठिकाणी भेट देऊन तास-तास थांबून अगदी बारकाईने पाठपुरावा करताना दिसतात. कार्यकारी अभियंत्या साधना बांदेकर, साहाय्यक अभियंते अरविंद फडते आणि कंत्राटदाराला उपयुक्त अशा सूचना करतात. दर्जेदार साहित्य वापरण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. भाऊचे मैदान हे प्रत्येकाने स्वतःचे समजून उत्कृष्ट काम, दर्जेदार साहित्य वापरून योग्य प्रकारे काम करावे. भाऊसाहेबासारख्या ऐतिहासिक पुरुषाच्या स्मृती मैदानाचे काम उत्कृष्ट झाल्यास तुमच्या कामाची इतिहासात नोंद होईल, असा सल्लाही ते देतात.
बांदोडा व आसपासच्या परिसरातील क्रीडा पटूंसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ व सुंदर मैदान उभारावे यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सन् 2007 साली असाच संकल्प सोडला होता. मात्र त्यांच्या या संकल्पाची पुर्तता होऊ द्यायची नाही म्हणून काही मुठभर लोकांनी केलेला विरोध त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोडून काढला. जनतेच्या हितार्थ होऊ घातलेल्या या मैदानाला मुठभरच काय पण विरोधाचे रान जरी उठले तरी डगमगणार नसल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. स्व. भाऊच्या स्मृतींना स्पर्ष करण्याचा हा आपला प्रयत्न असून मतदार व कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा आहे. सोडलेला संकल्प व केलेल्या निश्चयावर ठाम राहिल्याने सन 2012 साली स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदान पूर्णत्त्वास आले. क्रीडाप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांची सोय झाली. विरोध केलेल्या लोकांनीही त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानाची उपयुक्तता जाणू लागल्याने मैदानावर चालण्यासाठी व जॉगिंगसाठी गर्दी होऊ लागली. मैदान अपुरे पडत असल्याने खेळाडू व ज्येष्ठ नागरिक वारंवार मंत्र्यांकडे तक्रारी करु लागले. क्रीडा क्षेत्रावर विशेष प्रेम असल्याने मंत्र्यांनी या मैदानाला नवी झळाळी देण्याचे निश्चीत केले. मात्र योग्य नियोजना नंतरच आपण संकल्प सोडणार असल्याची वाच्यता त्यांनी कार्यकर्त्याकडे केली होती. कोरोनामुळे या कामाला मुहुर्त सापडत नव्हता. पावसात काम हाती घेतले असते तर अनेक अडचणी व दर्जावर परिणाम झाला असता. सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे अंदाजे अडीच कोटीरुपये खर्चून दोन टप्प्यात या कामाची दुरुस्ती होणार आहे.
जागतीक दर्जाचे कबड्डी मैदान, सिझन बॉल क्रिकेटसाठी खेळपट्टी, जॉगिंग ट्रकसाठी दोन टर्फ, फुटबॉल बॉक्स, सायकल ट्रक, प्रेक्षकांसाठी सुसज्ज आसनव्यवस्था, वीज रोषणाईची सोय असा विविध सुविधा आहेत.
क्रिकेट व जनतेसाठी विषेश लक्ष- मंत्री सुदिन ढवळीकर

बांदोडकर मैदान अतुलनीय करण्याचा मानस पुर्वीपासून असल्याची प्रतिक्रिया मंत्री ढवळीकर यांनी व्यक्त केली. बांदोडा भागातील अनेक क्रीडापटूंना मैदानाची गरज होती. मैदान नसल्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता. ही खंत असल्यामुळेच काशीमठ मैदानाचे काम हाती घेतले. फर्मागुडीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैदान राष्ट्रीय दर्जाचे करण्याचाही मानस आहे. अनेक सुख सोयीनी युक्त असे हे मैदान बनवले जाईल. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले सोपस्कार पार पाडायला हवे. वॉकिंगसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने टॅक वाढविण्यात येणार आहे. मडकई मतदार संघातली दोन मैदाने म्हणजे भविष्यातगोव्याचे भूषण ठरणार आहे. क्रिकेट खेळाच्या प्रेमात लहानपणापासून असल्यामुळे क्रीडा क्षेत्रात खूप रस आहे. मतदारसंघातीलच नव्हे राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करावे. त्यांना व्यासपीठ मिळावे ही आपली मनोमन इच्छा आहे. जनतेच्या हितार्थ स्वतः लक्ष घालून हे काम दर्जेदार करुन घेण्यासाठी आपली ही भेट असल्याची त्यांनी सांगितले.









