प्रतिनिधी /पणजी
गोमंतक मराठा समाज, गोवा या संस्थेतर्फे दिला जाणारा पहिले मुख्यमंत्री तथा भाग्यविधाते कै. भाऊसाहेब बांदोडकर स्मृति समाजभूषण पुरस्कार यावर्षी शिक्षणतज्ञ माजी मुख्याध्यापक व समाजकार्याला वाहून घेतलेल्या उमेश अच्युत नाईक यांना जाहीर झाला आहे. काल मंगळवारी पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर यांनी ही माहिती दिली.
गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे भाऊसाहेब बांदोडकर यांची 49 वी पुण्यतिथी संस्थेच्या येथील राजाराम सभागृहात दयानंद स्मृती सभागृहात 12 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे त्या सोहळय़ात सकाळी 11 वा. हा पुरस्कार प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते उमेश नाईक यांना प्रदान करण्यात येईल. यावेळी खास निमंत्रित म्हणून साळगावचे आमदार केदार नाईक, तर सन्माननीय पाहुणे म्हणून पणजीचे महापौर रोहित मोंसेरात उपस्थित असतील. या सोहळय़ापूर्वी सकाळी 9 वा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेबांच्या जीवन कार्याशी संबंधित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येईल.
वाघुर्मेकर यांनी सांगितले की, उमेश अच्य?त नाईक यांचे गेले चार दशकातील शिक्षण क्षेत्रातील व समाजासाठीचे कार्य महत्वपूर्ण आहे. गेल्यावषी भाऊसाहेब बांदोडकर स्मृती समाजभूषण पहिला पुरस्कार समजकार्यकर्ते डॉ. रामकृष्ण मोरजकर यांना दिला होता. शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख 25 हजार रुपये असे स्वरूप असेल. सचिव मंगेश कुंडईकर यांनी सांगितले की, 12 रोजी सकाळी मिरामार येथील भाऊंच्या समाधीवर संस्थेचे पदाधिकारी जाऊन त्यांना सर्वप्रथम आदरांजली वाहतील. संस्थेच्या बांदोडकर पुण्यतिथी सोहळय़ाला बांदोडकर ट्रस्टतर्फे सहकार्य मिळत आहे व त्यांचा प्रतिनिधी यावेळी उपस्थित असेल.









