रोप लागण झाल्यानंतर शेतामध्ये पाणीची साठवणूक करून ठेवावे लागते
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात संततधार पावसात शेतकरी बैलांच्या साहाय्याने चिखलगुट्टा पद्धतीने भाताची रोपे लावण्याची कामे गतीने करतानाचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे भात रोपांची लागण करण्याच्या कामाला गती आली आहे. पावसाचे व ओढ्या नाल्याचे पाणी शेतात आणून बैलांच्या नांगरटीने
भाताच्या रोपांची लागण केली जात आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर हा पावसाचा आगर म्हणून ओळखला जातो. येथील वार्षिक पर्जन्यमापन सरासरी चार ते साडेचार हजार मिलिमीटर असते. परंतु चालू वर्षी एक जूनपासून आजअखेर १३६४ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परंतु शनिवारी दुपारपासून पावसाने जोर धरल्याने रोप लावणीच्या कामाला वेग आला आहे.
चांदोली परिसरातील खुदलापूर, धनगरवाडा, मनदूर, सोनवडे, खोतवाडी, मिरुखेवाडी, गुढे पाचगणी, कोकणेवाडी, जळकेवाडी, येसलेवाडी, भाडुगळेवाडी तर शाहूवाडी तालुक्यातील शितूर, वारुण, उखळू, खेडे, शिराळे वारून, कांडवण, मालगाव पळसवडे, विरळे, यासह डोंगरदऱ्यातील डोंगर पठारावरील शेतामध्ये काही ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरण्या केल्या जातात.
यावेळी पावसाने लवकर सुरवात केल्यामुळे धुळवापेची पेरणी कमी प्रमाणात झाल्या. तर उर्वरित शेतीमध्ये जवळपास ६० टक्के शेतीत चिखलगुट्टा पद्धतीने भाताची रोप लागण केली जातात. यावर्षी पावसाने अवेळी सुरुवात केल्याने रोप लागण्याची कामे खोळबली होती. परंतु सद्या रोप लावणीलाच्या कामाला वेग आला आहे. रोप लागण करण्याअगोदर बैलाच्या तर काही ठिकाणी यांत्रिक ओजाराच्या साहाय्याने नांगरट करून त्यानंतर चिखलाचा गुट्टा केला जातो.
रानातील संपूर्ण तन चिखलात कुजवून त्यानंतर एकसारखे रान झाले की मग भातांची रोप महिला पुढून मागे मागे लावत येतात. अशा रोप लागणीने लावलेल्या भातात तन राहत नाही. खतांचे प्रमाण कमी लागते. रोप लागण झाल्यानंतर या शेतामध्ये पाणीची साठवणूक करून ठेवावे लागते. यामुळे भाताच्या रोपांची वाढ चांगली होते. असो भात खायला अत्यंत चवदार असतो.








