पुणे / प्रतिनिधी :
भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, रोजगारक्षम शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.
धनकवडीच्या भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा 28 वा स्थापना दिन येथे पार पडला. या वेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात नैतिक शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर देण्यासह अन्य महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. माणूस घडविणारे हे शिक्षण असेल. भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, रोजगारक्षम व संशोधन वृत्तीस सहाय्यभूत असे शिक्षण द्यावे. भारती विद्यापीठ ही पतंगरावांनी शून्यातून उभी केलेली शिक्षण संस्था आहे. अनेक पुढारी दुसऱ्यांनी उभी केलेली शिक्षण संस्था बळकावून शिक्षणमहर्षी बनले आहेत. पण पतंगराव कदम यांनी मात्र स्वकष्टाने भारती विद्यापीठ उभे केले. आजच्या स्पर्धेच्या युगात नावीन्याला पर्याय नाही.
डॉ. जेरे म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात झपाटय़ाने बदल होत आहेत. या बदलांचा सामना करण्यासाठी आपल्या शिक्षण संस्था सक्षम आहेत का? यामधील नव्या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी आपण तयार आहोत का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या सर्व सुविधा घरबसल्या मिळत असताना विद्यार्थ्यांना आता शिक्षणासोबतच पालकाच्या भूमिकेतील मार्गदर्शकाची गरज आहे. येत्या काळात नोकऱ्यांमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. अल्पकाळासाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. पूर्वीप्रमाणे एकदा पदवी घेतली की झाले, असे चालणार नाही. दर दहा वर्षानंतर आपल्याला शिकत राहावे लागणार आहे. तरुण पिढीला शिकवणे हे आजच्या शिक्षकासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी आपण तयार व्हायला हवे.








