संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रस्ताव येणे शक्य,
राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेत उल्लेखामुळे विरोधकांची आतापासूनच आगपाखड
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे भारताचे नाव ‘इंडिया दॅट इज भारत’ असे आहे. मात्र 18 सप्टेंबरपासून होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हे नाव केवळ ‘भारत’ असे करण्यासाठी प्रस्ताव मांडून तो संमत केला जाण्याची शक्यता आहे. काही राजकीय तज्ञांच्या मते घटनेत हे परिवर्तन करण्यासाठीच हे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप तरी केंद्र सरकारद्वारा तशी स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. विरोधी पक्षांनी मात्र, या अद्याप घोषित न झालेल्या निर्णयावर जोरदार टीका करुन त्याचा निषेध केला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये भारताचे नाव, त्याच्या चतु:सीमा आणि भारतात अंतभूत असणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे स्पष्ट करण्यात आली आहेत. या अनुच्छेदात भारताची दोन नावे असून भारतीय नाव भारत तर इंग्रजी नाव इंडिया असे नोंदविण्यात आले आहे. आता यांपैकी इंडिया हे नाव जाणार असून फक्त एकच नाव, अर्थात, ‘भारत’ हे राहणार आहे, अशी चर्चा आहे. मात्र, नेमके काय होणार हे काही दिवसांनीच समजणार आहे. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीश दास्याची आणि गुलामीची खूण आहे. त्यामुळे ती स्थायी रुपात पुसली जाणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रियाही आता व्यक्त होत आहे.
चर्चा घडण्याचे कारण
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जी-20 संघटनेची शिखर परिषद दिल्लीत होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने सर्व उपस्थित राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने शाही भोजन आयोजित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे या भोजन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका मुद्रित करण्यात आल्या आहेत. इंग्रजी भाषेतील या पत्रिकांवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ असा नेहमीचा उल्लेख न करता, ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भारताचे नाव आता भारत होणार का, ही चर्चा रंगली आहे.
अनेकांकडून स्वागत
भारताचे नाव केवळ भारत असे करण्याची योजना असेल तर तिचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांकडून सोशल मिडियापासून अनेक माध्यमांवर व्यक्त केली जात आहे. भारत हा प्राचीन काळापासून ‘भारत’ या नावानेच जगाला आणि भारतीयांना परिचित आहे. अशा स्थितीत इंडिया या नावाची आवश्यकता नाही. ते गेल्यास काहीच बिघडणार नाही. केंद्र सरकार असे करणार असेल तर ते योग्यच, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे.
प्रदीर्घ काळापासून मागणी
इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिले आहे. त्याची स्वतंत्र भारताला आवश्यकता नाही. त्यामुळे इंडिया हे नाव काढून केवळ भारत हेच नाव असावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने प्रदीर्घ काळापासून केली आहे. 2022 मध्ये गुजरातच्या आणंद मतदारसंघातील भाजप खासदार मितेश पटेल यांनी भारताचे नाव भारत किंवा भारतवर्ष असावे असा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. जनसंघाच्या काळापासून तो पक्ष ही मागणी करत आला आहे. नंतर भारतीय जनता पक्ष हे नाव धारण केल्यानंतही या पक्षाने तीच मागणी लावून धरली होती.
घटनासमितीतही झाली होती चर्चा
1949 मध्ये भारताची राज्य घटना निर्माण करणाऱ्या घटनासमितीत या भारताचे नाव कोणते असावे या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्या चर्चेत घटनासमितीच्या अनेक सदस्यांनी ‘भारत’ किंवा ‘भारतवर्ष’ हे नाव असावे, अशी मागणी केली होती. तथापि, अंतिमत: इंडिया दॅट इज भारत असे नाव मानले गेले.
नावावरुनही राजकारणास प्रारंभ
विशेष अधिवेशन कोणते प्रस्ताव मांडले जाणार, याची अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली असताना विरोधी पक्षांनी केवळ भारत या नावावर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींच्या निमंत्रणपत्रिकेत ज्या अर्थी प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा उल्लेख आहे, त्या अर्थी भारताचे नाव भारतच ठेवले जाणार हे निश्चित आहे, असे काँग्रेसने प्रतिपादन केले. केंद्र सरकार भारत आणि इंडिया यांच्यात फूट पाडू इच्छित आहे, अशी टीका काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी केली. आता राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मध्ये ‘इंडिया दॅट इज भारत’ असे न वाचता ‘इंडिया दॅट वॉज भारत’ असे वाचावे लागेल, अशी मल्लीनाथी जयराम रमेश यांनी केली.
हिमांत बिस्व सर्मा यांना अभिमान
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृतकाळा’त आपल्या प्राचीन आणि अस्सल भारतीय संस्कृतीचा आदर वाटावा अशीची ही कृती असेल. खरोखरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर मला त्यासंबंधी अभिमानच वाटेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘भारत माता की जय’ : बच्चन
अभिनय क्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन यांनी या संभाव्य निर्णयाचे स्वागत करताना आपल्या ‘एक्स’ संदेशात ‘भारत माता की जय’ ही घोषणा लिहिली आहे. या त्यांच्या प्रतिक्रियेला असंख्य नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारताला त्याची पारंपरिक आणि खरी ओळख आता मिळणार असून हे स्वागतार्ह असल्याचे अनेक नागरीकांनी नमूद केले आहे.
पासपोर्टचे काय ?
पासपोर्टवर इंडिया असाच उल्लेख असतो. भारत हे नाव अधिकृतरित्या धारण केल्यानंतर पासपोर्ट नवा काढावा लागणार का ? अशीही विचारणा काही जणांकडून होत आहे. इंडिया हे एक ‘ब्रँडनेम’ आहे. त्याचे काय होणार असा प्रश्न काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत उपस्थित केला आहे.
विरोधकांची अडचण नेमकी कशात ?
इंडिया या नावाचा निवडणुकीत लाभ मिळावा, यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीने आपले संयुक्त पुरोगामी आघाडी हे नाव टाळून आय.एन.डी.आय.ए. असे नाव नुकतेच धारण केले आहे. त्याचा उच्चार इंडिया असा होतो. पण भारत हे नाव अधिकृतरित्या देशाला मिळाल्यास या इंडिया या नावाला काही अर्थच उरणार नाही. या नावाचा राजकीय लाभही मिळणार नाही, ही विरोधकांची अडचण आहे. म्हणून ते आतापासूनच विरोध करत आहेत, अशीही प्रतिक्रिया आहे.
भारताचा होणार खऱ्या अर्थाने भारत ?
ड इंडिया हे नाव ब्रिटीश दास्याची खूण, ती पुसली जाण्याची शक्यता
ड भारताच्या नावातील ‘इंडिया’ गेल्यास स्वागत : सर्वसामानांची भावना
ड संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रस्ताव येईल का यासंबंधी उत्सुकता
ड अधिकृत निर्णय घोषित होण्याआधीच विरोधकांकडून आरडाओरड