वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम येथे सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. यावेळी त्यांच्यासमोर लावलेल्या फलकावर ‘भारत’ असे लिहिण्यात आले होते. सध्या देशात ‘इंडिया’ विरूद्ध ‘भारत’ अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच देशाचा नामोल्लेख ‘भारत’ असाच करण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवात केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कोणतीही महत्त्वाची बैठक किंवा परिषद सुरू असताना तेथे उपस्थित प्रतिनिधीच्या आसनासमोर देशाचे नावही त्याच्या फलकावर लिहिलेले असते. या नावावरून सभेला उपस्थित असलेली व्यक्ती त्या देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट होते.
उ-20 शिखर बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या समोर लावलेल्या प्लेटवर भारताऐवजी इंग्रजीत ‘भारत’ लिहिलेले दिसले. अशा स्थितीत देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खऱ्या आहेत का, या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘आशा आणि विश्वासाचे नवीन नाव – भारत’ अशी टॅगलाईनही वापरली आहे.









