पुणे / प्रतिनिधी :
नव्या शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर आता भारत साक्षरता अभियान राबविले जाणार असून, राज्यातील सुमारे 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक आणि एन ई पी (नवे शैक्षणिक धोरण) च्या राज्य समन्वयक नेहा बेलसरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बेलसरे म्हणाल्या ‘स्टेट करिक्यूलम प्रेमवर्क तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. इयत्ता दहावी आणि बारावीचे अवाजवी महत्त्व कमी करणे, व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल आणि प्रमाण वाढवणे या गोष्टींना सुरुवात झाली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षणाचा टप्पा नव्या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येईल. त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी शालेय शिक्षणाचा आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे पायाभूत शिक्षणासह एन ई पी मधील काही महत्त्वाच्या तरतुदींना पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होईल. केंद्र शासनाकडून राज्याला पाच शैक्षणिक वाहिन्या मिळाल्या असून, लवकरच त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या जाणार आहेत, असेही बेलसरे यांनी सांगितले.
सीबीएसई चे पुणे विभागीय संचालक रामवीर म्हणाले, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशातील सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. विजेची, पाण्याची, अन्नाची, ऊर्जेची बचत करणे, प्रत्येक विद्यार्थ्यांने एक झाड लावून त्याचे संगोपन करणे, आदी उपक्रम सुरू झाले आहेत. 29 आणि 30 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांची शिक्षक भरती संदर्भात प्रत्येक आठवडय़ाला एक अशा चार बैठका पूर्ण झाल्या आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधून बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे.








