ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३५०० किलोमीटरची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू केली आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणानंतर ही पदयात्रा गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेला बॉलिवूडमधून समर्थन मिळाल्यानंतर आता राज्यातील २५० लेखक आणि साहित्यिकांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय त्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन त्यांना एक पत्रही लिहिलं आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यातील २५० हन अधिक लेखक आणि कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले. लेखक, साहित्यिक दत्ता भगत, गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर, विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत. सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली.
हे ही वाचा : …तर मी हेलिकॉप्टरने कन्याकुमारीला गेलो असतो; राहुल गांधींची खोचक टीका
भारतीय राज्यघटनेनं देशातील लोकांना स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार दिलेले आहेत. परंतु केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांमुळं आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्यानं होत असलेल्या गैरवापरामुळं देशातील लेखक आणि साहित्यिकांना गुदमरल्यासारखं वाटत आहे. कलात्मक अभिव्यक्तीसाठी लेखकांना मुक्त स्वातंत्र्य आणि वातावरण हवं आहे, ते उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, असं म्हणत लेखकांनी कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला.