वृत्तसंस्था/ हैदराबाद
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’ने केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील टप्पा पूर्ण केल्यावर रविवारी तेलंगणात प्रवेश केला आहे. पदयात्रेने राज्यात प्रवेश केल्यावर तेलंगणातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधीचे जोरदार स्वागत केले आहे. लोकसभा खासदार तसेच तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी मणिकम टागोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी यांनी तेलंगणात काही काळासाठी पदयात्रात केल्यावर नारायणपेट जिल्हय़ातील गुडेबेलूर येथे पदयात्रा रोखली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे हैदराबाद आणि तेथून दिल्लीत पोहोचल्याचे समजते. दिवाळीनिमित्त रविवारी दुपारपासून 26 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांसाठी यात्रा रोखण्यात येत असल्याचे तेलंगणा काँग्रेस समितीकडून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
गुडेबेलूर येथून काँग्रेसची भारत जोडो यात्रा 27 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा सुरू होणार आहे. ही पदयात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी मकथल येथे पोहोचणार आहे. तेलगंणामध्ये ही यात्रा 16 दिवस चालणार आहे. यादरम्यान यात्रा 19 विधानसभा आणि 7 लोकसभा मतदारसंघांमधून जाणार असून 375 किलोमीटरचे अंतर कापणार आहे.
राहुल गांधी हे प्रतिदिन 20-25 किलोमीटरची ‘पदयात्रा’ करतील आणि यादरम्यान लोकांशी संवाद साधणार आहेत. बुद्धिवंत, विविध समुदायांचे नेते, क्रीडा, व्यवसाय आणि चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांना ते भेटणार आहेत. तेलंगणातील काही प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरांना राहुल गांधी भेट देणार असून यात्रेदरम्यान आंतर-धार्मिक प्रार्थनाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.









