स्फोटानंतर अलर्ट जारी, तपासासाठी एनआयए पथक दाखल; एलजींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मूतील कठुआ जिह्यातील हिरानगर येथून रविवारी कडक बंदोबस्तात भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली. शनिवारी विश्रांती घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सात वाजता हिरानगर येथून यात्रेला सुरुवात झाली. नरवाल येथे शनिवारी झालेल्या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे. या स्फोटाच्या तपासासाठी एनआयएचे पथक रविवारी घटनास्थळी पोहोचले आहे. दुसरीकडे, एलजी मनोज सिन्हा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख विकार रसूल वाणी, कार्याध्यक्ष रमण भल्ला यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा घेऊन राहुल गांधींनी रविवारी सकाळी 8 वाजता लोंडी चेकपॉईंट पार केले. ही यात्रा सांबा जिह्यातील ताप्याळ-गगवालमध्ये दाखल झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-पठाणकोट महामार्ग सील करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान रस्त्याच्या बाहेर दोन्ही बाजूला थांबलेल्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी राहुल यांचे जंगी स्वागत केले. राहुल गांधींच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेले निर्देश आम्ही पाळू, असे पक्षाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले.
रविवारी भारत जोडो यात्रा 25 किलोमीटरचे अंतर कापून चक नानक येथे दाखल झाली होती. तेथे यात्रेकरूंचा रात्रीचा मुक्काम राहणार आहे. सोमवारी सांबा येथील विजयपूर येथून यात्रा पुन्हा जम्मूकडे रवाना होणार आहे. राहुल गांधी यांच्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
महत्त्वाच्या अधिकाऱयांची बैठक
शनिवारी जम्मू शहराच्या बाहेरील नरवाल येथे झालेल्या स्फोटानंतर एलजी मनोज सिन्हा यांनी रविवारी विशेष बैठक बोलावली होती. यामध्ये एसएसपींसह सुरक्षा यंत्रणांचे अधिकारीही सहभागी झाले होते. बैठकीत एलजी सिन्हा यांनी बॉम्बस्फोटासंबंधी माहिती जाणून घेतली. तसेच तपास अधिकाऱयांना महत्त्वाचे निर्देशही दिले.
दोन स्फोटानंतर सुरक्षा अधिक सतर्क
नरवाल भागात शनिवारी दोन स्फोट झाले असून त्यात 9 जण जखमी झाले. स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. काँग्रेसचा दौरा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा या परिसरात हाय अलर्टवर असताना येथे स्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटांनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
30 जानेवारीला श्रीनगरमध्ये सांगता
भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात असून गुरुवारी रात्री पंजाबमधून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. श्रीनगरमध्ये 30 जानेवारी रोजी राहुल गांधी यांच्या हस्ते काँग्रेस मुख्यालयावर राष्ट्रध्वज फडकावून यात्रेची सांगता होईल. याक्षणी देशाच्या विविध भागातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.









