शिफारशीवर अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एनसीईआरटी या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने आपल्या आगामी पाठ्यापुस्तकांमध्ये ‘इंडिया’ या शब्दाच्या स्थानी ‘भारत’ हा शब्द उपयोगात आणण्याची सूचना केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे परिवर्तन केले जाण्याची शक्यता आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ही सूचना करण्यात आली असली, तरी हा निर्णय अंतिम नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
केंद्र सरकारने इंडिया या शब्दाच्या स्थानी ‘भारत’ हा शब्द उपयोगात आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालविला आहे. तसे धोरण नुकतेच घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशाची दोन नावे न राहता भारत हे एकच नाव राहणार आहे. एनसीईआरटी या शिक्षण संस्थेनेही केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या पाठ्यापुस्तकांमध्ये हे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देशाच्या एकात्मतेसाठी पाऊल
देशाचे एक नाव असणे हे नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रभावी ठरु शकते. शिक्षणातही देशाचे एकच नाव असणे महत्वाचे आहे. त्यामुळे पाठ्यापुस्तके इंग्रजी असली तरी त्यांच्यात भारताचे नाव इंडिया असे न असता, ते यापुढे भारत असे मुद्रित केले जाण्याची शक्यता आहे.
‘भारत’ या नावाला सहमती
संस्थेच्या कार्यकारी मंडळाची ‘भारत’ या नावाचा उपयोग करण्यासाठी सहमती आहे. ‘भारत’ हेच आपल्या देशाचे मूळ नाव असून ते अनेक हजार वर्षांपासून चालत आलेले आहे. इंडिया हे नाव परकीय आहे. भारताच्या राज्य घटनेतही इंडिया या नावासमवेतच ‘भारत’ हे नाव असून इंडियाच्या स्थानी ‘भारत’ हे नाव उपयोगात आणण्यास घटनेचीही मान्यता आहे. सध्या केंद्रीय शिक्षण संस्थांच्या पाठ्यापुस्तकांमध्ये मोठे परिवर्तन केले जात असून भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा प्राचीन इतिहास समजावा. त्या ज्ञानापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, असे धोरण केंद्र सरकारने अवलंबिले आहे. इंडियाच्या स्थानी ‘भारत’ या शब्दाचा उपयोग हा याच अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकांमध्ये ‘भारत’ या नावाचा इंडियाऐवजी समावेश सहज शक्य आहे, असे मत संस्थेच्या कार्यकारी मंडळामधील अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.









