प्रतिनिधी / सेनापती कापशी
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सद्गुरु बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून सर्वदूर ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेतगे येथे आज शुक्रवार दि. 3 मार्च 2023 रोजी भंडारा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे. या भंड्रायाची सुरुवात स्वत? सद्गुरु बाळूमामा यांनीच 1932 मध्ये सुरू केली आहे. त्यामुळे या भंडारा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी लाखो भाविकांची या उत्सवाला उपस्थिती लागते.
बाळूमामा यांनी स्वत? हा उत्सव हालसिद्ध नाथाचा भंडारा म्हणून सुरुवात केली होती. त्याकाळी कोणतीही सेवा- सुविधा दळण-वळणाची साधनं नसताना 40 गावातील लोकांना या उत्सवासाठी स्वत? फिरून निमंत्रित केले होते. हा उत्सव पाहून त्याकाळी लोक भारावून गेले होते. त्यानंतर हा भंडारा उत्सव दिवसें-दिवस वाढत गेला. आज हा भंडारा उत्सव हालसिद्धनाथ आणि बाळूमामा यांच्या नावाने सुरू आहे.
या उत्सवाचे सर्व नियोजन श्री सद्गुरु बाळूमामा चारिटेबल ट्रस्ट दरवर्षी करते. या ट्रस्टला येथील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, सहकारी दूध संस्था, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य आहे. शुक्रवार दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वा. भाकणूक सांगणारे भगवान डोणे (वाघापूर), मिरज, टाकळी, बेडगसह 25 गावांच्या वालंगाचे आगमन होणार आहे. 7 वाजता भव्य सभीना मिरवणूक, धनगरी ढोल वादन, हेडाम तसेच पहाटे 4 वाजता भाकणूक होणार आहे.
शनिवार दि. 4 रोजी सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता, 9 वाजता काल्याचे किर्तन, सकाळी दहा वाजल्यापासून महाप्रसाद व सायंकाळी 5:30 वाजता दिंडी निघणार आहे. असे भरगच्च कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.









