ऑनलाईन टीम / तरुण भारत :
टाळ-मृदंगाचा गजर अन् ज्ञानोबा माउलींचा अखंड जयघोष करत लाखो वारकऱ्यांचा मेळा आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला. माउलींच्या पालखीवर जेजुरीत भंडाऱ्याची उधळण होणार आहे. हे दृश्य पाहण्यासाठी वारकरी आणि भाविक आतुरलेले आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा रथ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. पालखी रथावरील सजविण्यात आलेले भगवान श्री विठ्ठल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पालखी सोहळय़ातील वारकऱ्याना आता मल्हारी मातड खंडोबाच्या भेटीची आस लागलेली आहे. सासवडहून निघालेल्या माऊलीच्या पालखी सोबतचे वारकरी सकाळपासूनच जेजुरीमध्ये पोहोचायला सुरू झालेले आहेत. आळंदीतून प्रस्थान झाल्यानंतर पहिल्यांदाच वारकऱ्यांना विस्तीर्ण असा पालखी मार्ग मिळाला. त्यामुळे कोणत्याही अडथळय़ाविना वारकरी मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या भेटीसाठी जणू आतुर झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
सासवडचा निरोप घेऊन निघालेल्या वारकऱयांना आता रस्त्यामध्ये ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. कधी डोक्यावर येणारे निरभ्र आकाश तर कधीमध्येच येणारे ढग. ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात सोबतच आता येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने आसमंत दणाणून निघत आहे. आज माउलींच्या पालखीचा मुक्काम जेजुरीत असेल. तर उद्या सकाळी ही पालखी वाल्ह्याकडे मार्गस्थ होईल.








