वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताच्या युकी भांब्रीने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत तो मायकेल व्हीनससह खेळत आहे. 14 व्या मानांकित इंडो-न्यूझीलंड जोडीने केविन क्रॅविट्झ आणि टिम पुएट्झ या चौथ्या मानांकित जर्मन जोडीला एक तास आणि 23 मिनिटांत 6-4, 6-4 असे पराभूत केले. त्यांचा पुढील सामना क्रोएशियाचा निकोला मेक्टिक आणि अमेरिकेचा अनुभवी राजीव राम यांच्याशी होईल, जे ड्रॉमध्ये 11 वे मानांकित आहेत. दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या या 33 वर्षीय भारतीय खेळाडूला त्याच्या एकेरी कारकिर्दीत पहिल्या फेरीच्या पुढे कधीच जाता आले नाही पण दुहेरीत तो चांगली कामगिरी करत आहे. त्याने या वर्षी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये तिसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.
ज्युनियर विभागात सर्व भारतीय बाहेर
दरम्यान, माया राजेश्वरन रेवतीला दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या हन्ना क्लुगमनकडून मुलींच्या दुसऱ्या फेरीत 7-6 (1) 4-6, 6-3 असा पराभव पत्करावा लागला. तिने दोन तास आणि दोन मिनिटे झुंज दिली. नंतर, मायाला जोडीदार लैमा सिनालीसह दुहेरी स्पर्धेतूनही बाहेर पडावे लागले, चौथ्या मानांकित लुना व्लाडसन आणि जेलीन व्हँड्रोमे यांच्याकडून 2-6, 2-6 त्यांना असा पराभव पत्करावा लागला. हितेश चौहान आणि क्रिश त्यागी यांनीही आपापल्या मुलांच्या दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडले.









