वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे झालेल्या दुबई ड्युटी फ्री खुल्या आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथिदार अॅलेक्सी पॉपिरीन यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. तसेच ग्रीसच्या स्टिफॅनोस सित्सिपसने एकेरीचे जेतेपद मिळविताना कॅनडाच्या अॅलिसिमेचा पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीतील सामन्यात युकी भांब्री आणि पॉपिरीन या जोडीने फिनलँडचा हेलीओव्हेरा आणि ब्रिटनचा पॅटेन यांचा 3-6, 7-6 (12-10), 10-8 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद मिळविले. एटीपी टूरवरील स्पर्धेतील भांब्रीचे हे चौथे तर एटीपी 500 दर्जाच्या स्पर्धेतील पहिले जेतेपद आहे. या स्पर्धेमध्ये भांब्री आणि पॉपिरीन या जोडीने दुहेरीतील टॉप सिडेड जोडी मार्सेलो अॅरव्हेलो आणि मॅटी पेव्हिक यांचा तसेच त्यानंतर ज्युलियन कॅश आणि लॉईड ग्लासपूल यांचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसने कॅनडाच्या फेलिक्स ऑगेर अॅलिसीमेचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या स्पर्धेतील पहिले जेतेपद पटकाविले. यापूर्वी दुबईमधील स्पर्धेत सित्सिपसला दोन वेळेला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. हा अंतिम सामना दीड तास चालला होता. पहिल्या सेटमध्ये सित्सिपसने पहिले सलग 4 गेम्स जिंकत अॅलिसिमेची सर्व्हिस भेदली. या सेटमध्ये अॅलिसिमेला केवळ 3 गेम्स जिंकता आले. दुसऱ्या सेटमध्ये सित्सिपसने अॅलिसिमेची दोन वेळेला सर्व्हिस भेदत 6-3 असा सेट जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. अॅलिसिमेने 2025 च्या टेनिस हंगामात यापूर्वी अॅडलेड आणि माँटेपिलेर येथील स्पर्धा जिंकल्या होत्या. पण दुबई स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.









