स्वयंपाक खोलीही कोसळण्याच्या मार्गावर : ग्रा. पं.ने दखल घेण्याची मागणी
वार्ताहर/गुंजी
गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भालके बी. के. गावच्या शाळेचे शौचालय आणि स्वच्छतागृह पावसामुळे कोसळले असून त्यालगत असलेली स्वयंपाक खोलीची इमारतही कोसळण्याच्या मार्गावर असल्याने धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून शाळेची इमारतही कौलारू आहे. अलीकडेच शाळेला लागून स्वयंपाक खोलीसाठी आरसीसी इमारत बांधण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून या इमारतीलाही गळती लागून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी झिरपत आहे. छताला अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेल्याने ही इमारत केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामधून पाणी झिरपत असल्याने स्वयंपाक करताना समस्या निर्माण होत असून अनेक ठिकाणी भांडी, बादल्या ठेवून पाणी काढण्याची वेळ स्वयंपाकींवर येत आहे. त्याचबरोबर शौचालय आणि स्वच्छतागृह पडल्यामुळे येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच ही देखील इमारत कोसळते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंपाकी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तरी ग्रा.पं. व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून डागडुजी करावी, अशी मागणी ग्रा.पं. माजी अध्यक्ष सुभाष घाडी आणि ग्रामस्थांनी केली आहे.









