खानापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील घरफोडीचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी भरदिवसा भालके के. एच. ता. खानापूर येथील वॉटरमन बाळू कुट्रे यांच्या घरातील 35 हजार रुपये चोरटय़ांनी लांबविले. त्यामुळे त्यांच्या घरातील कपाटातील कपडे, सामान अस्तव्यस्त करून चोरटय़ांनी पलायन केले.
याबाबत मिळालेले माहिती अशी की, गुंजी पंचायतीचे वाटरमन बाळू कुट्रे हे आपल्या पत्नीसमवेत शेताकडे गेले होते. दुपारी दीडच्या दरम्यान जेवण्यासाठी घरी आले असता समोरुन दार उघडून आत गेल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. मागील दार फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करुन लोखंडी कपाट फोडून रोख 35 हजार रुपये लांबविले.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरु आहे. चोरीच्या घटनामध्ये साधर्म्य आहे. बंद घरे लक्ष्य करुन मागील दारातून आत शिरुन चोरी करण्यात येत आहे. पोलिसानी गावोगावी जागृती मोहीम केली होती. गेल्या काही दिवसात चोऱया थांबल्या होत्या. आता सुगीचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील लोक भात कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. त्यामुळे घराला कुलूप लावून दिवसभर शेतात जात आहेत. चोरटय़ांनी पुन्हा आपले चोरीचे सत्र सुरुच ठेवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.









