जन्माष्टमी कथा महोत्सवाचा चौथा दिवस
बेळगाव : अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असलेल्या मानवाला जागे करण्यासाठी कधी कधी विज्ञानही झटके देते. भक्तांच्या संगतीत राहून भक्ती केल्यास आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो, असे विचार ईस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. ईस्कॉनच्यावतीने आयोजित जन्माष्टमी कथा महोत्सवासाठी चौथ्या दिवशी भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या जीवनावर कथाकथन केले. रुक्मिणीदेवी आणि भगवंत यांच्यातील झालेल्या संवादांची माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, भौतिक शरीर हे वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्गुणांनी भरलेले आहे. शरीराला सर्वस्व मानून आपण चाललो आहोत आणि हे करीत असताना भगवान श्रीकृष्णांना विसरत आहोत. पण शरीराचे हे सौंदर्य क्षणभंगूर आहे. कुलशेखर महाराजांच्या मते जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेले हे शरीर शेकडो सांध्यांनी जखडलेले आहे. या शरीराचा विनाश निश्चित आहे. त्यामुळे भक्तीमार्गात येऊन आपल्या जीवनाचा उद्धार करा, असा उपदेशही त्यांनी केला. या कथानकानंतर भजन, कीर्तन होऊन प्रसादाचे वितरण करण्यात आले.









