भगवंत उद्धवाला म्हणाले, भक्ताच्या अनन्य भक्तीवर भाळून मी त्याच्या हृदयात प्रकट होतो. मी हृदयात प्रगट होताक्षणी भक्तांना अलभ्य लाभ प्राप्त होतो आणि संसाररूप संकट दूर होते. जेव्हा त्याला माझ्या सर्वात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याच्या हृदयातील अज्ञान दूर होते. त्याचे सर्व संशय छिन्नविच्छिन्न होतात आणि कर्मवासना सर्वथैव क्षीण होऊन जातात.
उद्धवा! मी ज्याला हृदयामध्ये भेटतो, तेव्हा मी केवळ त्याच्या हृदयात साठत नाही तर सर्वात्मा सर्वरूपानेच प्रगटतो. माझे स्वरूप लहानसहान नसल्याने मी प्रगट झालो म्हणजे मग संसार म्हणून डोळय़ांना दिसतच नाही. गुणासहवर्तमान भेदाची त्रिपुटी मावळते, आणि भवभय तत्काळ पळून जाते. मी नारायण प्रगटल्याबरोबर लिंगदेह नाश पावतो. माझ्या स्वप्रकाशापुढे वासनेचे जाळे समूळ नाहीसे होते. वासनेला समूळ उपटून काढली की, जीवाभावासह संशय ठार होतो. तेव्हा सूर्यापुढे अंधार नाहीसा व्हावा त्याप्रमाणे कर्माचाही क्षय होऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्या कार्याबरोबर गुणही नाश पावतात. अज्ञानासहवर्तमान अविद्या नाश पावते. शिवपणासहवर्तमान जीव नाश पावतो व चिद्ग्रंथीसहवर्तमान अहंकारही नाश पावतो. तेव्हा सोहं-हंसाची न करताच बोळवण होते, हे लक्षात ठेव. जन्ममरण भीतीनेच पळून जाते व संसारावर पाणी पडते.
ह्याप्रमाणे गहन भक्तियोगाने जे माझे भजन करतात ते अशा निजभजनानेच समाधान पावतात. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान व कर्मयोग ह्या तिन्ही योगांचे भेद तुला मी सांगोपांग सांगितले. माझ्या प्राप्तीचे हेच खरे वर्म आहे. यामध्ये विशेषकरून माझी भक्तिच श्रे÷ होय. ती दुसऱया कोणाच्याच साहाय्याची अथवा सोबत्याची अपेक्षा करीत नाही किंवा दुसऱयाची ती मिंधिही राहात नाही. ती स्वतः आपल्या सामर्थ्याने माझी प्राप्ती साधून देते. माझे भजन केले नाही तर माझे ज्ञान कधीच उत्पन्न होणार नाही. कर्म जर मला अर्पण केले नाही, तर तेच अकर्म होते. म्हणून मुख्यतः जे आत्मज्ञान, ते माझ्याच भजनाची अपेक्षा करते. तिकडे कर्म तर काय बिचारे, केवळ रंक होय. ते माझ्या भजनावाचून पुढेच येऊ शकत नाही. तात्पर्य, ज्ञान व कर्म ही परमार्थात भक्तीमुळेच श्रे÷त्वाला पोचतात. त्या भक्तीचे खरे माहात्म्य आता तुला सांगतो ऐक. असा माझ्या भक्तीने युक्त असलेला योगी माझ्याच चिंतनात मग्न राहतो, त्याला ज्ञान किंवा वैराग्य नसले, तरी इहलोकी त्याचे कल्याण निश्चितपणे होते. कर्माचरण करावयाचे समजत नाही. वैराग्यज्ञान संपादन केलेले नाही, तरी माझ्या स्वरूपावर लक्ष ठेवून भक्तिभावाने माझे भजन केले तर ज्ञानकर्मादिक इतकेच नव्हे, तर मुख्य वैराग्यही स्वतः भक्तीच्या चरणी, शरण येऊन लोटांगण घालते. शरण येतात ही कसली मोठी गोष्ट? कारण ती तिच्या पोटी जन्मच घेतात आणि मग लाडाने तिला मिठी मारून आत्मानंदाची सुंदर गोडी तिच्यापाशी मागतात. तात्पर्य काय की, भक्ती ही ज्ञान, वैराग्य व कर्म ह्यांना आपल्या मांडीवरच खेळविते आणि परमानंद पूर्णपणे पाजून स्वतः त्यांचे पालन करते. ती माझी भक्ती साध्य झाली की, ज्ञानादिक हे सेवक बनतात. ह्याविषयीचेच निरूपण सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, कर्म, तपश्चर्या, ज्ञान, वैराग्य, योगाभ्यास, दानधर्म आणि अन्य कल्याणसाधनांनी जे प्राप्त होऊ शकते, ते सर्व, माझ्या भक्ताला मिळते. माझ्या भक्तियोगाने स्वर्ग, मोक्ष किंवा माझे वैकुंठधाम यांपैकी भक्त ज्याची इच्छा करतो, ते सहजासहजी मिळवितो.
स्वधर्मकर्मेकरून जे प्राप्त होते, कडकडीत तप आचरण केल्याने जे साध्य होते किंवा सांख्यज्ञानाच्या विचाराने निश्चयेकरून जी वस्तु हाती लागते तसेच विषयत्यागाने जे प्राप्त होते अष्टांगयोगाने जे साध्य होते, वायु, जल, पाने सेवन करून शेवटी जे फल प्राप्त होते त्याचप्रमाणे वेदाध्ययनाने जे मिळते, सत्य भाषणाने जे साध्य होते अनेक साधनांनी जे प्राप्त होते ते सारे माझ्या एका भजनाने मिळत असते.
क्रमशः







