अध्याय सविसावा
साधूंचे महात्म्य सांगताना भगवंताना साधूंची तुलना सूर्याशी करायचा मोह झाला आणि त्यातून त्यांनी दोघांच्यातली साम्यस्थळेही दाखवली पण पुढे ते म्हणाले की, साधू हे केव्हाही सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहेत कारण सूर्याला अस्त आहे पण साधू हे सदासर्वदा प्रकाशमानच असतात. सूर्याला ढग झाकू शकतात, पण साधू हे सदासर्वदा निर्मळच असतात. सूर्याला सर्वकाळ फिरत रहावे लागते, पण साधू हे न फिरता ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असतात.
ग्रहणाची वेळ आली असता सूर्याला राहु ग्रासून टाकतो, पण साधू ग्रहांचा ठावठिकाणा नाहीसा करून आत्मानंदातच राहतात. ग्रहाची बाधा शरीरापुरती मर्यादित असते पण साधूंना देह प्रारब्धावर टाकून राहण्याची कला अवगत असल्याने ते देही असून विदेहीपणे रहात असतात. दाट धुके पडले असता रविमंडळ झाकून जाते परंतु साधूंना अंधार, धुके किंवा मोहपटल यत्किंचितही बाधत नाही. त्यांच्या सात्विकतेचा प्रकाश कायमच सर्वांना स्वयंउद्धाराचा मार्ग दाखवत असतो. सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना ताप देतो पण साधू निजांगाने जगाला शांत करतात. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य माणसाचे आयुष्य एक एक दिवसाने कमी करतो पण साधू आत्मोपदेशाने सर्वाना अक्षय करून सोडतात. सूर्यप्रकाशामुळे सर्वांना सृष्टी दिसू लागते आणि सत्संगाच्या दृष्टीने चिन्मात्रस्वरूपाने सृष्टीची स्थिती ठसते. ह्याप्रमाणे विचार करून पाहिले असता साधू हे सूर्याहून श्रेष्ठ आहेत.
साधू हे पृथ्वीवरचे ज्ञानसूर्य असून आपल्या संगतीने संसारीजनांना संसारांतून तारणारे आहेत. मृत्युलोकावर साधू हेच खरे देव आहेत. साधू हे दीनांचे मित्र व सख्खे बंधू आहेत. मी परमानंदस्वरूप प्रसिद्ध परमात्मा, साधुरूपाने जगात नांदत आहे. देवांना बलिप्रदान द्यावे, तेव्हाच देव प्रसन्न होतात परंतु सज्जन पूर्ण दीनदयाळू असल्यामुळे ते कृपेनेच तारणारे आहेत. इष्ट, मित्र, भाऊबंद, बंधू वगैरे केवळ द्रव्यलोभानेच आप्तांच्या भजनी लागणारे असतात परंतु साधू हे निर्लोभी आहेत. संत हे कृपेचे केवळ दीप आहेत. संत हे माझे निजस्वरूप आहे. म्हणूनच सत्संगाने पातक जाते. साधकांना निष्पाप करून त्यांना ब्रह्मस्वरूपाला ते पोचवितात. उद्धवा! साधूंपाशी खरोखरच इतका कृपाळूपणा असतो, हे निश्चित आहे. मी निर्गुणपणाने पूर्ण ब्रह्म आहे आणि साधू हे माझेच रूप असल्याने ते चालते बोलते ब्रह्म आहेत. त्यांना मनापासून शरण गेले की, माणसाच्या इच्छा, वासना, अहंकार नष्ट होतात. कोणत्याही इच्छा होत नसल्याने त्या अपुऱ्या राहण्याचा प्रŽच येत नाही. त्यामुळे साधकाचे जन्ममरण नाहीसे होते. म्हणून साधू हे शरण जाणाऱ्याला आश्र्रयरूप आहेत. भक्तीभावाने सत्संगती धरली, तर संसारी लोकांना मुक्ती मिळते, असे उद्धवाला श्रीकृष्णांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले. पुढे ते म्हणाले, सद्भावाने माझी भक्ती केली असता साधकांना विरक्ती उत्पन्न होते. स्त्री, पुत्र, देह यांच्याशी ममत्वाचा जो अहंकार असतो तो समूळ मिथ्या होऊन जाणं याचा अर्थ विरक्ती. माणसाला आपल्या गोतावळ्याबद्दल ममत्व असतं आणि आपल्या देहरूपाबद्दलही ममत्व असतं. हे ‘मी’ आणि ‘माझे’चं आसक्तीयुक्त प्रेम आहे. ते नष्ट होणं म्हणजे विरक्ती. म्हणजेच प्रथम सर्वाभूती प्रेम आणि त्या सर्वांचा आधार असलेल्या भगवंताचं भजन ही झाली ‘भक्ती’, त्या भगवंताच्या भक्तीनं दिव्य भावाचं स्फुरण ही ‘प्राप्ती’ आणि त्या दिव्यत्वाच्या प्रकाशात ‘मी’ आणि ‘माझे’ चा संपूर्ण निरास ही झाली विरक्ती! या तिन्हीचा संयोग ज्याच्या अंतरंगात स्थिरावत असेल, त्याच्या वात्सल्यपूर्ण, कऊणामय, दिव्य, अनासक्त, निराग्रही, निरपेक्ष, सरळ अंत:करणाची अथांगता शब्दात मांडता येणार नाही. जर माणूस संकुचितपणाच्या जोखडातून सुटत असेल आणि व्यापक मनानं चराचराबाबत सहृदय होत असेल, तर ती भक्ती अवश्यमेव करायला हवी.
एकनाथी भागवतातील सविसावा अध्याय समाप्त.








