अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले उद्धवा, विषयत्याग का करायचा आणि तो आपोआप कसा घडतो ह्याचे इंगित समजून न घेता, नुसता वरवरचा केलेला त्याग साधकाला बाधक ठरतो. हा एकप्रकारचा कुयोगच म्हणायचा. कुयोग म्हणायचे कारण म्हणजे भगवद्भजन न करता, वेदविधी न आचरता केलेला विषयत्याग निष्फळ ठरतो. मनात ईश्वराचा ठावठिकाणा नसताना केलेला त्यागाचा प्रयत्न काहीच साध्य करून देत नाही. उलट त्यामुळे दामटून गप्प बसवलेली इंद्रिये उसळी मारून विषयभोगाकडे खेचून नेतात. द्रव्यदाराविषयासक्ती ह्याबद्दल मनात असणाऱ्या तीव्र वासना त्याने वरवरच्या केलेल्या विषयत्यागाच्या चिंधड्या उडवून टाकतात. काही साधक आम्ही अतिश्रेष्ठ असे राजयोगी आहोत असे म्हणून स्वत:ला जनकमहाराजांच्या बरोबरीचे समजतात आणि यथेच्छ विषयसेवन करतात. त्यांच्यासाठी वैराग्य हजारो कोस दूर राहते. हा कुयोगच नाहीतर काय? स्वत:ला राजयोगी म्हणवणारे स्वत:ची विषयासक्ती चोरून ठेवतात आणि बाह्यत: विरक्ती मिरवतात. हीच कुयोगाची अवस्था रे बाबा उद्धवा. अशा निरनिराळ्या कुयोगांचं फल म्हणून पुन:पुन्हा जन्म आणि मरण अटळ असतं आणि यातून त्यांना कुणीही सोडवू शकत नाही. त्यांना धड इहलोकीचा विषयभोग मिळत नाही की त्यांच्या हातून धड परमार्थातील त्याग घडत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टींना तो अंतरतो. हा दु:खदायक कुयोग होय. उद्धवा परमार्थात त्याग हा मुद्दामहून करावा लागत नसून, परमार्थातील तत्वांची सत्यता पटून भोगविलासातील व्यर्थता ध्यानात आल्याने तो आपसूकच घडतो. असे झाले की, आपण विषयांचा त्याग केला आहे ह्याची जाणीवही साधकाच्या मनाला शिवत नाही किंवा विषयांच्या केलेल्या त्यागामुळे आपले मोठे नुकसान झाले आहे अशी खंतही मनाला वाटत नाही. असे त्यागसाधन केल्यावर साधकाला पूर्ण अनुताप होतो. पण खूप वेळा असंही होतं की, साधक ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी त्याग करायला तयार होतो आणि ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक तो अभ्यासही तो करू लागतो. त्याचं असं सगळं व्यवस्थित चालू असताना मधेच त्यात निरनिराळ्या प्रकारची विघ्ने येऊन मोठा अनर्थ ओढवतो. माणसाची मूळ प्रवृत्ती विषयांकडे ओढ घेण्याची असते. त्यामुळे त्याला कामबाधा फार लवकर होते. झालेली कामबाधा पूर्ण होण्यात काही अडचण आली की, क्रोध उफाळून येतो. हे लक्षात घेऊन जो अत्यंत निगुतीने योगाभ्यास करतो त्याची परमार्थ साधनेत येणारी विघ्ने जळून भस्म होतात. प्रारब्धामुळे जर योग्याच्या साधनेत व्यत्यय आला आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला तरी तो कर्माच्या आधीन झालेला नसल्याने, त्याला चांगलीच गती मिळते. योग्याच्या इच्छेनुसार त्याला कुलीन संपन्न घराण्यात जन्म मिळतो आणि यथावकाश त्याचा अपुरा राहिलेला योगाभ्यास पुढे सुरु होतो किंवा योग्याच्या इच्छेनुसार त्याला योगसाधना करणाऱ्यांच्या कुळात त्याचा जन्म होतो आणि त्यांची योगसाधना लवकरच पुढे सुरू होते आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. जो योगी साधना करत असताना माझी भक्ती करत असेल तो अणुमात्रही कशात गुंतत नाही कारण मी भक्तांचा कैवारी श्रीपती अहोरात्र माझ्या भक्तांना राखत असतो. ज्याला माझ्या भक्तीची आवड असते तिथे विघ्ने कुठून येणार? माझ्या भक्तीमुळे मोठमोठ्या विघ्नांचा चकणाचूर होतो. समजा एखादा योगी माझी भक्ती करत नसेल किंवा माझे भजन करत नसेल तरी तो पूर्व संस्कारामुळे कर्मयोग आचरत असल्याने उद्धरून जातो. ज्यांना जीवनमुक्ती मिळालेली आहे त्यांना पुनर्जन्म जरी नसला तरी ह्या जन्मात प्रारब्धानुसार कर्मे होत असतातच. त्यामुळे जीवनमुक्त झालेल्यांच्या हातून कर्मत्याग होतो असे म्हणता येणार नाही. जीवनमुक्ताला मिळणारे मोक्षपद हेच साधकाचे मुख्य ध्येय असते. त्यामुळे साधक माझी भक्ती करत असो वा नसो दोन्ही परिस्थितीत त्याला कर्मबंधन बाधत नाही.
क्रमश:








