Bhakti Aalve received her doctorate from the Department of Marathi, Goa University
येथील सौ. भक्ती आळवे यांना गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाची डॉक्टरेट प्राप्त झाली आहे. ‘संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा भाषिक व वाङमयीन अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. गोवा विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुख डॉ. सुनीता उम्रसकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. भक्ती आळवे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भक्ती आळवे यांचे राष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध सादर झाले आहेत. त्या एम. ए. मराठी असून शिक्षणशास्त्र विषयात एम. एड. आहेत. मराठी विषयातील सेट व नेट परीक्षेसाठी त्या पात्र ठरल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत वक्तृत्व, कथाकथन, निबंध, एकपात्री अभिनय, नाट्य, गायन, वेषभूषा, एकांकिका स्पर्धेत विविध पातळीवर पारितोषिके मिळविली आहेत. अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात निवेदिका म्हणून त्या सहभाग घेतात.
आजवर त्यांनी वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी, खेमराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बांदा, नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा, सरकारी विद्यालय तोरसे पेडणे, सारस्वत विद्यालय म्हापसा, डीएड कॉलेज पर्वरी, कला अकादमीचे रंगभूमी महाविद्यालय मिरामार, संत सोहिरोबानाथ विद्यालय विर्नोडा पेडणे अशा विविध शिक्षण संस्थांमध्ये काम केले आहे. सध्या त्या हरमल येथील गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत आहेत.
त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्राचार्य उदेश नाटेकर, मराठी विभागप्रमुख डॉ. गीता येर्लेकर यांनी अभिनंदन केले आहे. बांदा भजनी मंडळाचे गिरी महाजन यांच्या त्या सुकन्या तर बस व्यवसायिक आबा आळवे यांच्या स्नुषा होत. त्यांच्या यशाबद्दल गोव्यासह बांदा परिसरात अभिनंदन होत आहे.
प्रतिनिधी /
बांदा