मनोरंजनाची विपुल साधने उपलब्ध नव्हती तेव्हा लहान मुले-मुली एकत्र जमून वेगवेगळे खेळ खेळायचे. त्यात रंगणारा खेळ म्हणजे भातुकली. छोटी चूलबोळकी, दाणेचुरमुरे असलेला खाऊ, बाहुलाबाहुली आणि खरीखरी वाटावीत अशी क्षणात संपून जाणारी खोटी नाती. घरातल्या, समाजातल्या नात्यांचे प्रतिबिंब असणाऱ्या भातुकली या खेळाचे वैशिष्ट्या म्हणजे मुलांच्या मनाच्या घडणीवर होणारा संस्कार हेच होते. खेळाची वेळ कोणतीही असो, भातुकलीच्या खेळात सूर्योदय ते सूर्यास्त हा काळ साजरा व्हायचाच. घडीभर चालणाऱ्या या खेळात आई-वडिलांचा अवघा प्रपंच आणि त्यातली सुखदु:खं यांची छाया स्पष्ट दिसायची. स्वयंपाक, मनाने मोठे होऊन केलेल्या गप्पाटप्पा आणि बाहुलीचे लग्न झाले की खेळ संपायचा. खेळ संपला की तो विस्मरणात जायचा. मन गुंतवून तो रंगवलेला संसार पुसून गेल्यावर कुणालाही वाईट वाटायचे नाही. त्या खेळाची आठवणही राहत नव्हती. कारण मुलांच्या भावविश्वातला तो खऱ्या अर्थाने ‘दोन घडीचा डाव’ होता.
स्वामी मुक्तानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे. एकदा एक माणूस फळफळावळ व भाजीबाजारात गेला. तिथे त्याने मिरच्या घेताना लोकांना पाहिले. त्याने मिरची डोळ्यांनी पहिल्यांदाच बघितली. त्याला वाटले, ज्याअर्थी लोक आवडीने मिरच्या घेत आहेत तेव्हा हे छोटे स्वादिष्ट फळ असले पाहिजे. म्हणून त्याने दोन किलो मिरच्या खरेदी केल्या आणि खाण्यासाठी तो एका झाडाखाली जाऊन बसला. पहिली मिरची खाल्ली मात्र, तिखटाने त्याची जीभ भाजली. नाकातोंडातून पाण्याच्या धारा लागल्या. त्याला वाटले, दुसरी मिरची गोड असेल; पण तीसुद्धा तिखटच. एखादी तरी गोड निघेल या आशेने तो एकामागून एक मिरच्या खात सुटला. एक माणूस जिद्दीने मिरच्या खातोय हे दिसल्याबरोबर अनेक लोक त्याच्या भोवती गोळा झाले. त्याला विचारले, ‘तुम्ही हे काय करताय?’ ‘पुष्कळ लोक हे फळ घेताना दिसले म्हणून मी हे घेतले व खातोय’, तो म्हणाला. त्या माणसाला लोक म्हणाले, अहो ही मिरची आहे. हिचा वापर माफक प्रमाणात करायचा असतो. एवढे सांगूनही आणि तिखटाने तोंडाची आग होऊनही त्या माणसाने मिरच्या खाणे काही बंद केले नाही. आश्चर्य वाटून लोक म्हणाले, हे गोड फळ नसून तिखट मिरची आहे. आता तरी खाणे थांबवा ना! तो माणूस म्हणाला, ‘हे बघा, यासाठी मी पैसे मोजले आहेत. तेव्हा मिरच्या मला खाऊन संपवल्याच पाहिजेत.’ स्वामी मुक्तानंद म्हणतात, प्रपंचाचा खेळही असाच असतो. एखादा तरी प्रसंग आत्मानंद देणारा असेल म्हणून लोक मिरच्या खात बसतात. आज नाहीतर उद्या, उद्या नाही तर परवा.. एखादी स्वादिष्ट मिरची खायला मिळेल या आशेने माणूस मिरच्या खात सुटतो. परस्परांनाही मिरच्याच वाटतो. तोंड जळले, नाकातोंडाला पाण्याच्या धारा लागल्या तरी आपण प्रपंच विकत घेतला असल्यामुळे त्यातल्या संकटांत, चटक्यात गुंतवणूक असते. मौजमजा, करमणूक, पैसा, कष्ट यात माणूस इतका विलक्षण रमतो की रमलेला असतानाच काळ त्याचा घास घेतो. हा दोन घडीचा डाव त्याच्या लक्षात येत नाही. माणूस पैसा, मित्र मानसन्मान, आप्त, मुलेबाळे यांना शाश्वत सुख मानतो. स्वामीजी म्हणतात, ‘एक या आकड्याशिवाय काढलेली ही शून्याची लांबलचक माळ असते. एकमेव आत्मस्वरूपाचे अमृतपान झाले म्हणजेच सगळ्या शून्यांना किंमत येते.’ दत्तावतारी संत नानामहाराज तराणेकर म्हणत, ‘प्रपंच मुळातच फटका आहे. प्रपंच करू नका असे नाही, पण त्याला किती ठिगळं लावत बसाल? प्रपंच करताना वेळात वेळ काढून नामस्मरण करत जा, म्हणजे प्रपंच सुखाचा होईल.’
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात माऊली म्हणतात, ‘विषयांचा विसर पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजी।।’ माणसाचे मन विषयांमध्ये सतत रममाण असते. त्याचेच चिंतन चाललेले असते. भूतकाळात रमलेले आणि भविष्यकाळाचा वेध घेणारे मन संकल्प-विकल्प आणि कल्पना या भुलभुलय्यात असे हरवून जाते की प्रपंच हा संपून जाणारा खेळ आहे याचे त्याला भान रहात नाही. विषयांचा विसर केव्हा पडतो? जेव्हा मन एकाग्र होऊन सद्गुरूंच्या स्मरणात नाहीसे होते. माणूस इंद्रियांच्या अधीन असतो. माणसाच्या शरीरामधली दोन अंगुली जीभ त्याला सतावते. अन्न सेवन केले की पोट भरते. मात्र जिभेला चव हवी असते. ती चांगल्या चांगल्या पदार्थांसाठी हट्ट धरून बसते. शिवाय गरज नसेल तिथे माणसाला स्वत:चे मत मांडायला फार आवडते. मौनाचे तिला वावडे असते. म्हणून संत गाडगेबाबा जिभेला म्हणतात, ‘जिभले तुले काय धंदा? घडीभर भजावे गोविंदा’. तू घडीभर परमेश्वराचे नामस्मरण कर. नामस्मरणाने इंद्रिये शांत बसतात. त्यांची चंचलता म्हणजे कसमस मोडते. माऊली म्हणतात, ‘मनाची घडी घडे । हृदयामाजी ।।’ या ओवीचे विवेचन करताना मामा महाराज देशपांडे म्हणतात, एखादे मोठे निसर्गचित्र भिंतीवर लावलेले असते. त्यात सूर्य, डोंगर, झाडे, नदी, होड्या, पक्षी अशी रंगीबेरंगी दुनिया असते. ते चित्र बघताना माणसाच्या मनात अनेक संदर्भ उमलतात. ते चित्र जर छोटी घडी करून बाजूला ठेवले तर ते सारे पुसून जाते. त्याचप्रमाणे मनामध्ये अस्ताव्यस्त पसरलेले मायाजाल मनाची घडी केली की मिटून जाते. मनामुळे काळ कळतो. इथे घडीचा अर्थ काळ असा आहे. काळ नाहीसा झाला तर सारे शून्य होते.
प्रपंच हा खरोखर अस्तित्वात आहे असा भास घेऊनच जग जगत असते. आयुष्यात एखादा मनाला आवडणारा प्रसंग घडला की त्याला वाटते, जीवनात ही घडी अशीच राहू दे.. क्षणात उमलून क्षणात मावळणारा आनंद मन पकडून ठेवते. लोकांतात रमणाऱ्या मनाला जेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धात सक्तीचा एकांत लाभतो तेव्हा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर साजिवंत होतो. काळाची रिळे भराभर सरकत जातात. ते क्षण मन पुन्हा जगू लागते. भर्तृहरी म्हणतात, ‘मला वाटले मीच काळ खर्च करतो आहे; पण प्रत्यक्षात तोच माझा अपव्यय करतो आहे हे मला समजलेच नाही.’
काळावर मात करण्याचे औषध एकच. जे संतांनी सांगितले आहे. सृष्टीनिर्मात्या परमेश्वराचे नामस्मरण. घडी करणे, घडी मोडली, विस्कटली तर पुन्हा घालता येणे म्हणजे मन एकाग्र करणे. या मनाला एकाग्र करण्याची सवय लावून घ्यावी. कशी? – तर ‘घडी घडी घडी चरण तुझे, आठविती रामा! आसनी शयनी भोजनी गमनी छंद तुझा आम्हा’… एकच परमेश्वर मनात भरून उरला की, ‘मास दास भ्रात नाथ तूच एक पाही, केशव म्हणे करी कृपा शरण तुझ्या पायी’. त्याच्या पायाशी चित्त स्थिर झाले की ‘घडी’ म्हणजे काळ उरत नाही. मागेपुढे, जेथे जातो तेथे तोच दिसतो आणि मनुष्यजन्माचे सार्थक होते.
-स्नेहा शिनखेडे








