कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब यांचे प्रतिपादन
पणजी : आपल्या गोव्यात पखवाजवादक निर्माण झाले ते भजनसम्राट पं. मनोहरबुवा शिरगावकर यांच्यामुळेच. त्यामुळे अनेक निपूण पखवाजवादक निर्माण झाले, असे प्रतिपादन बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोकजी परब यांनी केले. श्री श्याम आर्ट्स प्रॉडक्शन मेरशी आणि कला आणि संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने मेरशी येथे ‘गोवा चतुरंग’ कार्यक्रम झाला. समारंभाचे उद्घाटन किशोर नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक देवानंद नाईक, अध्यक्ष गिरीश उस्कैकर, कार्यक्रम आयोजक सुशांत गोवेकर, मार्गदर्शक दामोदर केरकर, देवेंद्र कळंगुटकर, अॅड. राघवेंद्र कळंगुटकर उपस्थित होते. कार्यक्रमात मास्तर देविदास गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत हरेंद्र शिरोडकर व कमलेश पुऊषोत्तम मेस्त्री यांनी पखवाजवादनाची जुगलबंदी सादर केली. तसेच बाबू गडेकर यांचे शिष्य रजतचंद्र तिरोडकर आणि अनील पंडित यांचे शिष्य प्रज्योत जनार्दन राऊत यांनी तिलवाडा सादर केला. अजीत मळीक यांचे शिष्य नंदेश दत्ताराम च्यारी यांनी पखवाजवादन केले. तद्नंतर गायक प्रेमानंद वेलिंगकर आणि एकनाथ गोवेकर यांनी सुश्राव्य गायन सादर केले. त्यांना हार्मोनियमसाथ विठ्ठल खांडोळकर व तबलासाथ अजीत देसाई यांनी केली. मास्तर पुंडलिक कळंगुटकर यांनी सर्वांचे आभार मानले.









