पुणे / प्रतिनिधी :
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकुर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी येथे दिले. ‘टाडा’कायद्याअंतर्गत दाखल असलेला देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात 17 आरोपींनी अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जयंत उर्फ भाई विष्णू ठाकुर, दीपक ठाकुर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नऊ ऑक्टोबर 1989 रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळय़ा झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ऍक्टव्हीज (प्रिव्हेंन्शन ऍक्ट) नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात 2004 मध्ये टाडा कायद्यातील विविध कलमे तसेच बेकायदा शस्त्रात्र बाळगल्याप्रकरणी (आर्मस् ऍक्ट) आरोप निश्चित करण्यात आले होते.
या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ऍड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ऍड. सुदीप पासबोला, ऍड. सुधीर शहा, ऍड. रोहन नहार, ऍड. प्रीतेश खराडे, ऍड. सचिन पाटील, ऍड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून करण्यात आलेला ग्राह्य धरून न्यायालयाने भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.









