पावसाळ्यापूर्वी भंगीबोळाची स्वच्छता करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी
बेळगाव : शहरातील भंगीबोळामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून, कचऱ्याची उचलही होत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे. या कचऱ्यावर मोकाट कुत्री आणि इतर प्राण्यांचा वावर वाढला असल्याने याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दुर्गंधीही पसरली असून, विशेष करून भाग्यनगर सातवा क्रॉस येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे महापालिकेने येथील भंगीबोळातील कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे. शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहे. कचरा कोठेही न टाकता महापालिकेच्या घंटागाडीकडे द्यावा, असे आवाहन केले जात आहे.
मात्र अद्यापही नागरिकांतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरात विविध ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीपण भंगीबोळात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. भंगीबोळातील कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामध्ये कुत्री, उंदीर, साप व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून भाग्यनगर सातवा क्रॉस येथील भंगीबोळात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. पण त्याची उचल झालेली नाही. ओला, सुका व प्लास्टिक कचरा असल्याने महापालिकेने पावसाळ्यापूर्वी येथील भंगीबोळाची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.









