ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. उद्या (दि. 27) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ते बीआरएस या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यासाठी राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
रविवारी पंढरपूरमध्ये भालके गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत भालके यांनी आपण असंख्य कार्यकर्त्यांसह बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. स्व. भारत नानांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचे व मतदारसंघाचे छत्र हरपले होते. अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली द्यायची सोडून पक्षाने वेगळी दिशा दाखवण्याचे काम केल्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलत असल्याचा निर्णय घेतल्याचे भालके यांनी सांगितले. भालके यांच्या निर्णयाचे पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून भालके यांना पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. जूनच्या पहिल्या आठवडय़ात भालके हे के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला गेले होते. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊनही त्यांनी फारशी दखल नाही. स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नसल्याची खंत भालके यांनी यावेळी बोलून दाखवली होती.








